पुणे : जालना आणि यवतमाळ येथे दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाचा पेपर फुटला नसल्याचा स्पष्ट निर्वाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दिला. परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे समाजमाध्यमात पसरविण्यात आल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. तसेच, या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.दहावीची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली. पहिल्याच दिवशी यवतमाळ आणि जालना जिल्ह्यातील पेपरफुटी झाल्याचे आरोप झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे सविस्तर स्पष्टीकरण दिले.

‘जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल या परीक्षा केंद्रावर पेपरफुटीच्या चर्चेच्या अनुषंगाने भेट देऊन मराठी (प्रथम भाषा) विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी केली असता, समाजमाध्यमात फिरणारी दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून, अन्य खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली असल्याचे दिसून आले. हस्तलिखित मजकूर असलेल्या काही पानांमध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे असल्याचे आढळले. त्यामुळे, प्रश्नपत्रिका फुटलेली नसून, गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे ‘व्हायरल’ केल्याचे दिसून येते. याबाबत जिल्हा प्रशासनाने सविस्तर चौकशी करून अहवाल देण्याबाबतच्या आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे परिपत्रकात म्हटले आहे.

‘यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कोठारी या परीक्षा केंद्रांवरील घटनेचा सविस्तर अहवाल घेतला असता, संबंधित केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका ‘व्हायरल’ केल्याचे दिसून येते. या प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे नमूद करण्यात आले आहे.

पालकांची गर्दी हटविण्यासाठी पोलिसांची मदत

‘जालना जिल्ह्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशाला या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. पोलिसांच्या मदतीने पालकांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्राबाहेर बाहेर काढण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही,’ असेही राज्य मंडळाचे नमूद केले आहे.

पाच गैरमार्ग प्रकरणांची नोंद

परीक्षेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात पाच गैरमार्ग प्रकरणांची नोंद झाली. त्यातील एक प्रकरण पुणे विभागात, तर चार प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागात नोंदवली गेली आहेत.

Story img Loader