महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल असं म्हटलं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे बजेट राज्याच्या विकासाला चालना देऊ शकत नाही, असं म्हणत टीका केली आहे. यानंतर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व भाजपाचे खासदार भागवत कराड यांनी देखील महाराष्ट्राच्या बजेटवर प्रतिक्रिया दिली. पुण्यात विविध क्षेत्रांमधील प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Maharashtra Budget 2022 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल – मुख्यमंत्री
यावेळी भागवत कराड यांनी सांगितलं की, “महाराष्ट्र सरकार हे घोषणा करण्यात पक्क आहे, घोषणा करतं आणि मग पुढे काहीच करत नाही. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पैसे दिले असं सांगितलं होतं, मात्र कुठे पैसे दिले? विशेष म्हणजे मला हे सांगायचं आहे की, दिवाळीच्या कालवाधीत केंद्र सरकारने पेट्रोल पाच रुपये आणि डिझेल दहा रुपयांनी कमी केलं होतं, कर कमी केला होता आणि अपेक्षा केली होती की त्याच धर्तीवर राज्यांनी देखील कर कमी करावा. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे त्या राज्यांमध्ये कर कमी झाला, परंतु महाराष्ट्र सरकारने कर कमी केलेला नाही. या बजेटबद्दल मला काही जास्त माहिती नाही परंतु जी थोडीफार माहिती घेतली आहे, त्यानुसार पेट्रोलियमवर कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त कर कमी केलेला नाही. व्यापार, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रात विशेष काही सवलत दिलेली नाही. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि आदिवासी यांच्यासाठी कुठलीही सुविधा नाही. मूलभूत सुविधा वाढावी म्हणून कुठली ठोस योजना महाराष्ट्राच्या बजेटमध्ये नाही.”
तसेच, “सर्वांना माहिती आहे की, सध्यातरी वीज बील भरलं नाही म्हणून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. त्याबद्दल देखील वीज तोडली जाणार नाही, असं कुठेही सांगितलं गेलं नाही. शेतकरी त्रासात आहेत, मात्र वीज बिलात सवलत दिली जात नाही.” असं भागवत कराड यांनी यावेळी बोलून दाखवलं.
Maharashtra Budget 2022 Live : राज्यात CNG स्वस्त; अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
याचबरोबर, नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपाला चांगलेच यश मिळाले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेक अंदाज बांधले होते, तसेच महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होईल, असे भाजपाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भागवत कराड यांना म्हटले की, “सरकार कधी पडेल माहिती नाही. पण लोकांच्या मनात भाजपा आहे. जनताच ठरवेल हे महाविकास आघाडी सरकार कधी पाडायचं.” तर, “संजय राऊत यांनाच विचारा गोवा, युपीत शिवसेनेला किती मतं पडली?” अशा शब्दात संजय राऊत यांना त्यांनी टोला लगावला.
पेट्रोल डिझेल दरवाढ होण्याची शक्यता आहे याबाबत बोलताना कराड म्हणाले की, “युक्रेन आणि रशिया युद्धामुळे पेट्रोल,डिझेल दर वाढतील असं सांगितले जातं, यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. याबाबत एक केंद्रीय टीम जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी काम करत आहे.”