पुणे : जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याची निराशा केली आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तरतूद आणि हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात करण्यात आल्या नसल्याचे दिसून येत आहे. त्याउलट यापूर्वीच मंजूर झालेल्या मेट्रो मार्गिकांची माहिती देत येत्या काही वर्षात २३.२ किलोमीटर लांबीच्या मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. तसेच पुणे-शिरूर उन्नत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या चार पदरी उन्नत मार्गांची घोषणा पवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळात सादर केला. पवार जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने अर्थसंकल्पात पुण्याला झुकते माप मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र पायाभूत सुविधा विकसीत करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

पुणे-शिरूर या ५४ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे पवार यांनी जाहीर केले. त्यासाठी ७ हजार ५१५ कोटींचा खर्च येणार असून तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीच्या चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित असून त्यासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यातील अठरा नवीन न्यायालयांमध्ये पौड, इंदापूर आणि जुन्नर येथे न्यायालयांची उभारणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रस्तावित २३.२ किलोमीटर लांबीच्या मार्गिका येत्या वर्षभरात सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टाॅप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी नऊ हजार ८९७ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. स्वारगेट ते कात्रज मार्गिकेला मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अर्थसंकल्पात पुणेकरांच्या पदरी निराशा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसृष्टीसाठी ५० कोटींची तरतूद

‘शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने व्हावे यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल,’ अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली होती. त्यानुसार ही तरतूद करण्यात आली आहे. शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी किमान २८० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून राज्य सरकारने केलेल्या तरतुदीमुळे ही कामे आता वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.