पुणे : लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता केंद्रित ठेवून राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली. बारामती तालुक्यातील शिरसणे येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात काही चांगले निर्णय घेतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतचा कर माफ करण्यात आला आहे. या निर्णयासह कृषी क्षेत्राबाबतीतही काही चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याचा अर्थसंकल्प मीही सादर करणार आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर केला जाईल. ‘सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत. सहकार चळवळ संपुष्टात आली, तर खासगी संस्थांकडून पिळवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहकारी संस्था टिकविण्यासाठी, त्या वाढीस लागण्यासाठी यापुढील काळात डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल. सहकार आणि कृषी, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा, अल्पसंख्याक, महिला आणि बालविकास अशी खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) आहेत. ती जाणीवपूर्वक घेण्यात आली आहेत. सध्या साखरेचे भाव वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री, गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाली असून ज्यूस टू इथेनाॅलला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि प्राथमिक आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.’ असे पवार म्हणाले.