पुणे : ‘लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात मात्र ‘भोपळाच’ देण्याचे काम महायुती सरकारने केले. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने पुणेकरांना अनेक स्वप्न दाखवली होती मात्र सत्तेत आल्यानंतर याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पुण्याच्या विकासासाठी भरीव तरतूद केलेली नाही. लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देणार, या निवडणुकीपूर्वीच्या घोषणेलाही अर्थसंकल्पात हरताळ फासण्यात आला आहे. ज्या विश्वासाने पुणेकर नागरिकांनी महायुती सरकारला निवडणुकीत यश मिळवून दिले. त्यांचा विश्वासघात या सरकारने केला असल्याचे अंदाजपत्रकातून दिसून येत असल्याचे जोशी म्हणाले.

पुण्यात महायुतीचे दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहेत. केंद्रातही एक राज्यमंत्री आहे. पुणेकरांनी भाजप आणि महायुतीला भरभरून मते दिल्यामुळे या चौघांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मात्र, अंदाजपत्रकात केवळ पुणेकरांच्या पदरी निराशाच आहे. पुरंदरचा विमानतळ आम्ही लवकरच करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारंवार दिले. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदरच्या विमानतळाचा उल्लेख देखील केलेला नाही, भूसंपादनासाठीची तरतूदही नाही.

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्याची इच्छाशक्ती असती तर पीएमपीएमएलसाठी २ हजार बसगाड्या घेण्यासाठी तरतूद करण्यात आली असती. पण, तशी तरतूद करण्यात आलेली नाही. पुणे मेट्रो चा पहिला टप्पा अजून पुर्ण झाला नाही आणि दुसऱ्या टप्प्यासाठी पुढील दहा वर्षांसाठीचा वायदा करून ९ हजार कोटींच्या तरतुदी केल्या आहेत. खडकवासला-खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बाग अशा दोन मार्गांसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचे म्हटले आहे. या योजनांना पूर्ण होण्यासाठी १० वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. ही घोषणाही पोकळच आहे.

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीचा गाजावाजा सत्ताधारी पक्ष करीत आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना कागदोपत्रीच राहिली आहे, याचा उपमुख्य मंत्री अजित पवार यांना विसर पडला आहे. सत्ता आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांना अंदाजपत्रकात हरताळ फासण्यात आल्याची टीकाही काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी केली.