पुणे : गेल्या काही दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले. अधिवेशन तोंडावर येते त्यावेळी प्रत्येक मंत्र्याला आपल्या विभागाची तयारी करायला वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार हे शंभर टक्के आहे. नेमकी तारीख मला काही सांगता येणार नाही. परंतु मंत्रीमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये बंद घराची टेहळणी करून घरफोड्या करणारा सराईत जेरबंद; २० तोळे सोन्याचे दागिने जप्त
जी-२० परिषदेच्या शिक्षण समितीची पुण्यात होणारी बैठक, शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीसाठी केसरकर पुण्यात आले होते. खातेवाटपासंदर्भात केसरकर म्हणाले, की मंत्र्यांना दिलेल्या विभागांव्यतिरिक्त उर्वरित विभाग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे कोणाला कोणता विभाग द्यायचे, विभागांचे मंत्री बदलायचे का या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. आगामी निवडणुकांच्या जागावाटप सूत्राबाबतही केसरकर यांनी भाष्य केले. लोकसभेची तयारी प्रत्येकाने सुरू केली पाहिजे. जागा किती मिळतात हे महत्त्वाचे नाही. जागा जिंकणे महत्त्वाचे असते. शिवसेना आणि भाजपचे जागा वाटपाचे जे सूत्र ठरले होते ते कायम आहे. त्या सूत्राप्रमाणे थोड्या जास्त जागा भाजप लोकसभेसाठी घेत आले आहेत. शिवसेना राज्यावर अधिक लक्ष केंद्रित करते. त्यामुळे आमच्या वाट्याला ज्या जागा नेहमी येतात. त्या जागांसाठी तयारी करण्यात काहीही चुकीचे नाही, असेही त्यांनी सांगितले.