पुणे : जुन्नरऐवजी बारामतीमध्ये बिबट्यासह टायगर आणि आफ्रिकन सफारी असा तीन टप्प्यांत मोठा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित केला होता. याबाबत पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात खर्चही नमूद केला होता आणि या प्रकल्पाच्या आराखड्याचे कामही सुरू झाले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बिबट्या सफारी जुन्नर तालुक्यातच करण्याबाबत मागणी होत होती. अखेर मंत्रिमंडळ बैठकीत बारामतीऐवजी जुन्नरलाच बिबट्या सफारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अजित पवारांना धक्का मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> १२ जिल्ह्यांमधील चार कोटी जुनी कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध

मानव बिबट्या संघर्षाची सर्वात मोठी समस्या जुन्नर तालुक्यात आहे. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट्या सफारीला तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळाता उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात बारामती बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतुद केली होती. त्यामुळे जुन्नरमधून बिबट्या सफारी हा प्रकल्प बारामतीला पळविल्याची ओरड सुरू झाली होती. त्यानंतर जुन्नरच्या सफारीच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (डीपीआर) पवार यांनी निधी मंजूर केला होता. कुरण-खानापूर आणि आंबेगव्हाण यांपैकी एके ठिकाणी हा प्रकल्प होणार होता. कुरण-खानापूर येथे मानवी वस्ती जवळ आहे.

हेही वाचा >>> ….ही तर आयुक्तांची मग्रुरी, मनमानी कारभार शिवसेना नीट करेल!; अंबादास दानवे संतापले

आंबेगव्हाणची जागा ४६ हेक्टर आहे. या ठिकाणी तीन नाले असून ही जागा नगर जिल्‍ह्याला लागून आहे. तसेच या ठिकाणी अकोले तालुक्यातून पुर्वीपासून रस्ता असल्याने नव्या रस्त्यांची गरज नाही, असे यापूर्वीच अहवालातून समोर आले होते. त्यामुळे या ठिकाणीच बिबट्या सफारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे वनविभागांतर्गत बारामती वनपरिक्षेत्रामध्ये गाडीखेल या गावामधील सुमारे १०० हेक्टर वन क्षेत्रात ‘बिबट्या सफारी’ प्रकल्प प्रस्तावित होता. यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सन २०२२-२३ अर्थसंकल्पात नमूद केले होते. तसेच दौंड, इंदापूर, बारामती येथील कान्हेरी वन उद्यान, मयुरेश्वर अभयारण्य, भादलवाडी, भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र आदी परिसरामध्ये ‘इको टुरिझम सर्किट’ विकसित करण्याचे प्रस्तावित होते. जुन्नर येथे यापूर्वीच बिबट्या निवारण केंद्र आहे, बिबट सफारी हा बारामतीचाच प्रकल्प असून त्याच्या आराखड्याचे काम सुरू करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत होते. मात्र, हा प्रकल्प जुन्नरला होणार असल्याने पवारांना धक्का मानला जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet meeting decision leopard safari in junnar instead of baramati pune print news psg 17 zws