कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली
पुणे : राज्यात सध्या परस्परविरोधी हवामान निर्माण झाले असून, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पहाटे काहीसा गारवा, तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुख्यत: निरभ्र आणि कोरडे हवामान राहणार असल्याने किमान तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असताना तापमानात पुन्हा चढ- उतार सुरू झाला आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सुरू झाले आहेत. परिणामी किमान तापमानात काहीशी घट होऊन पहाटे काहीसा गारवा जाणवतो आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांवर असल्याने दुपारी उन्हाचा चटका जाणवतो आहे. परस्परविरोधी स्थितीमुळे सध्या राज्यात विविध ठिकाच्या कमाल आणि किमान तापमानात १० ते २० अंशांपर्यंत फरक दिसून येत आहे. दोन्ही तापमानामध्ये १ ते ४ अंशांनी घट नोंदविली जात आहे. गुरुवारी चंद्रपूर येथे उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस, तर नाशिक येथे निचांकी १२.४ अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याने विदर्भात अनेक ठिकाणी गारवा वाढल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
हवामान भान : मुंबई (कुलाबा) २९.५/२०.५, सांताक्रुझ २९.०/१८.२, अलिबाग २७.४/१९.०, रत्नागिरी ३०.४/१८.०, पुणे ३१.१/१२.६, नगर ३२.६/१३.०, जळगाव ३२.२/१४.२, कोल्हापूर ३२.९/१६.३, महाबळेश्वर २६.८/१३.२, मालेगाव ३२.२/१४.६, नाशिक २९.८/१२.४, सांगली ३३.६/१२.९, सातारा ३२.१/१२.७, सोलापूर ३४.५/१७.२, औरंगाबाद ३०.८/१६.६, परभणी ३४.०/१६.५, बीड ३३.६/—, अकोला ३३.६/१६.०, अमरावती ३५.२/१६.८, बुलडाणा २९.८/१५.४, ब्रह्मपुरी ३४.३/१५.१,चंद्रपूर ३६.०/१६.०, गोंदिया ३०.१/१३.१, नागपूर ३३.०/१४.७, वाशीम ३३.०/१५.४, वर्धा ३३.२/१८.० आणि यवतमाळ ३२.५/१५.८.