लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पिंपरी : ‘इतिहासात महाराष्ट्राचा दृष्टिकोन व्यापक राहिला आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, अशी आपण यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढतो. असे अनेक प्रसंग आहेत. पण, जातिवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही. इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळाले. जातींचे ऐक्य नष्ट झाले, की राज्य संपते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ वा वर्धापनदिनानिमित्त चिंचवड येथे मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, किशोर शिंदे, बाबू वागसकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘इतिहासात महाराष्ट्राचा दृष्टिकोन व्यापक राहिलेला आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, अशी आपण यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढतो. असे अनेक प्रसंग आहेत. पण सन १९१९ मध्ये ‘छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकात जदुनाथ सरकार यांनी सांगितले होते कि, पुढील १०० वर्षात मराठे जगात पहिल्या क्रमांकावर जातील. मात्र तसे झाले नाही. कारण जातीवादामुळे महाराष्ट्राला देशाचे देखील नेतृत्व करता आलेले नाही. इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळाले. जातींचे ऐक्य नष्ट झाले कि राज्य संपले. जोपर्यंत आपण आयडियॉलॉजीला आपली आयडेंटिटी करत नाही, तोपर्यंत आपण जगात अग्रेसर होऊ शकत नाही. सर्वांना एकत्रित घेणारा महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी असली पाहिजे’.
विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उमेदवार पराभूत झाले. आमदार येऊन गेले. तरीही, या पक्षातील माणसे एकत्र कशी काय राहतात? अनेकांना हा प्रश्न पडला आहे. पण, आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना? तसे फेरीवाले मनसेत नाहीत. आज या पदपथावर, तिकडून डोळा मारला की त्या पदपथावर, असले राजकीय फेरीवाले उभे करायचे नाहीत. दुकान बांधू पण, फेरीवाले होणार नाही,’ अशा शब्दांत पक्षांतर करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी टोला लगाविला. ‘महाराष्ट्राचा चिखल झाला आहे. आग लावली जात आहे. डोके फोडली जात आहेत. चाललेल्या कामांकडे लक्ष विचलित करण्यासाठी जातीपातीचे विषय, समाजमाध्यमांवर डोकी भडकवणे हे जाणूनबुजून उद्योग सुरू आहेत. यावर गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राजकीय दांडपट्टा चालवणार आहे,’ असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘प्रभू रामचंद्रांनी १४ वर्षांचा वनवास भोगला. लढाया केल्या. सेतू बांधला. रावणाला मारून माता सीतेची सुटका केली. परत अयोध्येला गेले. इथे आम्ही १४ वर्षांत केवळ बांद्रा-वरळी सागरी सेतू बांधला.
‘महिला दिन जिजाऊंच्या नावाने ओळखला जावा’
‘जागतिक महिला दिन’ हा जिजाऊंच्या नावाने ओळखला पाहिजे. जिजाऊंच्या मनात प्रथम स्वराज्याची संकल्पना होती. जिजाऊंनी शहाजी महाराजांना बंड करायला लावले. शिवाजी महाराजांकडून स्वराज्य निर्माण करून घेतले. हा महाराष्ट्राचा आदर्श आहे. सर्वांत पुढारलेल्या स्त्रिया महाराष्ट्रात आहेत,’ असेही राज ठाकरे म्हणाले.
‘श्रद्धा आणि अंधश्रद्धेतून बाहेर पडा’
‘पक्षाचे पदाधिकारी कुंभला गेले होते. गधड्यांनो पाप कशाला करता? बाळा नांदगांवकर छोट्याशा कमंडलूमधून गंगेचे पाणी घेऊन आले. मी ते घेतले नाही. श्रद्धेला काही अर्थ आहे, की नाही? एकही नदी स्वच्छ नाही. नदीला माता म्हणतो. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार असे सांगितले जाते. राज कपूर यांनी यावर चित्रपटही काढला होता. लोकांना वाटले, झाली गंगा स्वच्छ. लोक म्हणाले, अशी गंगा असेल तर आम्हीही अंघोळ करायला तयार आहोत. पण, गंगा अजून काही स्वच्छ झाली नाही. या श्रद्धा आणि अंधश्रद्धेतून बाहेर या,’ असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
१२ मार्च रोजी सर्व पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. प्रत्येकाच्या कामाचा दर १५ दिवसांनी आढावा घेतला जाणार आहे. कोणताही पदाधिकारी कामचुकारपणा करेल त्याला पदावरून काढून टाकले जाईल. पक्ष आणि संघटना मजबूत करणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.