पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आ. रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली. त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही राजकारणाचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे राजकीय व्यक्तीच्या हाती जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यकाल संपलेल्या पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीसाठी लांब राहावे लागणार होते. सत्तारुढ गटाचे सर्वच उमेदवार यामुळे बाहेर जाणार होते. त्यामुळेच सत्तारुढ गटाकडून रोहित पवार यांचे नाव पुढे करण्यात आले होते. अधिकृत घटनेच्या वादात गेली दोन वर्षे अडकलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी रोहित पवार यांना पुढे करण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला.

हेही वाचा >>> VIDEO : विश्वजीत कदम देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, भाजपात जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण!

संघटनेवर खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र क्रिकेट संघटना देखील मागे राहिली. महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही. निवडणूकीपूर्वी पडद्यामागे रंगलेल्या नाट्यात क्रिकेटचा पराभव झाला हेच या निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. निवडणुकीत रोहित पवारांनी एकतर्फी बाजी मारली. शंतनु सुगवेकर आणि घटनादुरुस्तीसाठी पाठपुरावा करणारे अभिषेक बोके दोघेही रोहित पवारांपासून खूप दूर राहिले.

हेही वाचा >>> शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून क्रीडा क्षेत्रातही आपले निर्विवाद वर्चस्व राखणारे शरद पवार यांचे दोन नातू या निवडणूकीच्या रिंगणात होते. रोहित पवार आणि शरद पवारांचे भाचे जावई विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक हे या वेळी एकमेकांविरुद्ध उभे होते. मात्र, अभिषेक बोके या निवडणूकीत फारच फिके पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची यापूर्वीची निवडणूक बेकायदेशी असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. पण, या निकालापूर्वीच नवी निवडणूक देखील पार पडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cricket association select rohit pawar ncp senior leader sharad pawar grandchildren pune print news bbb 19 ysh