पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीची कबड्डी खेळत असताना कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला असून ही घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल,” असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.

पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना ; इयत्ता आठवीतील मुलीची कोयत्याने वार करून हत्या!

“यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांनी दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना पुढे म्हटलं की, “अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत”.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra deputy cm ajit pawar on minor kabbadi player murder in pune sgy
Show comments