पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ – देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी सर्व स्टॉल आणि तेथील गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी शेणापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींसह अन्य वस्तू तयार केलेल्या स्टॉलला त्यांनी भेट दिली. त्यावेळी गणपतीची मूर्ती पाहून अरे असे नको, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात असं म्हणत त्यांनी इतर वस्तूंची माहिती जाणून घेतली.
त्यानंतर तिथे असलेल्या दोन तरुणींकडे अजित पवारांनी विचापसू केली. “तू कुठली, तुम्हाला मेरिटवर प्रवेश मिळाला का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर त्यांनी ‘हो दादा मेरिटवर प्रवेश मिळाला’ असल्याचं सांगितलं. साक्षी खटके हिने ९८.१० आणि सायली देशमुखने ९९.१० टक्के मिळाल्याचं सांगितलं. दोघींचे गुण ऐकल्यानंतर अजित पवारांनी हात जोडत अवघडच आहे असं म्हणत शुभेच्छा देऊन पुढील स्टॉलकडे गेले.
त्यानंतर अजित पवारांनी भाषणावेळी साक्षी खटके आणि सायली देशमुख या दोघींच्या गुणांचा संदर्भ देत सांगितलं की, “इथल्या मुली हुशार आहेत. ९८ टक्के मार्क आहेत. आमचे दोन वर्षाचे मार्क एकत्र केले, तरी ९८ टक्के होणार नाहीत”. अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पुढे ते म्हणाले की, “मी दुधाचा व्यवसाय केला आहे. गायींची खरेदी- विक्री करायला आम्ही जायचो. गाडीत गाय घेऊन जायचो. वेळ झाला की विहीर बघून गायीला पाणी पाजणं, चारा घालणं हे काम आम्ही केलं आहे. त्यामुळे यातले बारकावे आम्हाला माहित आहेत. शेतकरी गोवंशाबद्दल हळवा असतो आणि कृतज्ञदेखील असतो. वेगवेगळे गोवंश टिकले पाहिजेत. पण काहीजण या सगळ्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत”.