पुण्यात निर्बंध शिथील केल्यानंतर लोकांकडून पर्यटनस्थळं तसंच बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक लोक राज्याबाहेर जात असल्याचं सांगताना त्यांनी पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जाईल असा इशाराही दिला आहे. पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसे आदेश काढण्याची वेळ येऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
लोणावळा : भुशी डॅम ओव्हर फ्लो मात्र पर्यटकांसाठी एक बॅड न्यूज
“पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, खोपोली अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी होत असल्याचं सांगितलं आहे. इतक्या मोठ्या रांगा लागत आहेत. नागरिक असं का करत आहेत माहिती नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अनेक लोक राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. देवदर्शनासाठी जात असतील तर आम्ही अडवणार नाही, हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. पण काही जण ट्रेकिंगला वैगेरे जात आहेत. तसं जर झालं तर पुण्यातील लोक जे बाहेर गेले होते ते परत आल्यानतंर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावं लागेल. तसे आदेश काढावे लागतील,” असा इशाराच अजित पवारांनी यावेळी दिला.
शनिवार, रविवार दुकानं बंद राहणार
“करोना संकट हळूहळू कमी होत असलं तरीही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहतील असा निर्णय घेतला असून सोमवार ते शुक्रवारच दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल करण्यात येईल. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण महाराष्ट्रात करोना कमी होऊ लागला असला तरी रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी अद्याप प्रमाण जास्त आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
पुणेकरांसाठी मोठी बातमी! शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहणार; अजित पवारांची घोषणा
“टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी अमेरिका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही ठिकाणी तिसरी लाट येऊ पाहत असल्याचं सांगितलं आहे. खासकरुन अमेरिका आणि इंग्लंड येथे मोठ्या प्रमाणात लसीसकरण होऊनही अशी परिस्थिती झाली आहे. नीट काळजी घेतली नाही आणि जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडतं. ही गोष्ट होता कामा नये,” असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
५३ टक्के मृत्यू ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे
“पिंपरी चिंचवडमध्ये दुसऱ्या लाटेत झालेल्या मृत्यूंचं विश्लेषण करण्यासाठी चार रुग्णालयं निवडण्यात आली होती. तिथे ५३ टक्के मृत्यू ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे आहेत. २५ ते ६० या वयोगटात ५३ टक्के मृत्यू आहे. अनेक तरुण-तरुणींना आपल्याला काय होणार असं वाटत आहे. पहिल्या लाटेत ६० च्या वरील वयस्कर लोकांना संसर्ग होत होता. पण आता जो रिपोर्ट आला आहे त्याचा बारकाईने अभ्यास केला असता ही माहिती समोर आली,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. ४३ टक्के मृत्यू कोणताही आजार नसलेल्या व्यक्तींचे आहेत, तसंच २० टक्के मृत्यू ३१ ते ४५ वयोगताटील आहेत अशी माहिती दिली. महिलांपेक्षा पुरुषांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
कोव्हॅक्सिन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कोव्हिशिल्ड घेऊ नये
कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी अडचण होत असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. तसंच कोव्हॅक्सिन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परदेशात जायला मिळावं यासाठी नव्याने कोव्हिशिल्ड लस घेऊ नये अशी सूचना अजित पवार यांनी केली आहे. शनिवारी आणि रविवारी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे सांगताना अजित पवारांनी लोकांना पिकनिकला किंवा विनाकारण फिरण्यासाठी घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं.
“तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची ठरू शकते असं म्हणतात. मात्र पालकांनी घाबरुन नये. आपल्याला त्याला संपूर्ण तयारीनिशी सामोरं जायचे आहे. त्या दृष्टीने तयारी करत आहोत,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेनेसोबत की स्वबळावर?
अजित पवार यांनी यावेळी शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा स्वबळावर लढायचे की, कोणासोबत जायचे ते मी सांगेन असं सूचक विधान केलं आहे.
निलेश राणेंच्या टीकेला उत्तर
“बीडमध्ये काही लोक ताफ्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. तिथे नेमके काय झाले मला माहित नाही, परंतु मी कुणालाच भेट नाकारत नाही. सगळ्यांना वेळ देतो…असं असताना कुठे तरी एखादी गोष्ट घडते आणि त्याची ब्रेकिंग न्यूज होते,” असं सांगत अजित पवारांनी भाजपाचे माजी खासदार निलेश राणेंच्या टीकेला उत्तर दिलं.
पुणे जिल्ह्यातील गावात १०० टक्के लसीकरण
अजित पवार यांनी यावेळी पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गावात १०० टक्के लसीकरण झालं असून देशातील पाहिलं गाव ठरलं असल्याची माहिती दिली आहे.