मराठी मातीशी इमान महाराष्ट्र शाहीर परिषद
विनायक करमरकर, पुणे
डफावर पडणारी शाहिराची थाप आणि शाहिरांचे वीरश्रीयुक्त पोवाडे हे महाराष्ट्राचे खास वैशिष्टय़. छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्य स्थापनेची कल्पना प्रत्यक्षात येत असतानाच मराठी मातीत ती संकल्पना जागृत ठेवण्याचे कार्य शाहिरांच्या पोवाडय़ांनी केले. शाहिरांनी उभा महाराष्ट्र ढवळून काढण्याचा दुसरा प्रसंग म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. स्वराज्याची स्थापना आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा या दोन्हींमध्ये शाहिरांचे योगदान मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ानंतर महाराष्ट्रातील शाहिरांचे संघटन ‘शाहिरी संगत’, ‘शाहिरी संघटन’ या नावाने सुरू होते. पुढे शाहिरांचे राज्यव्यापी संघटन उभे करण्याचा प्रयत्न शाहीर योगेश यांनी केला आणि महाराष्ट्र व शाहिरी योगदान या दोन गोष्टींचा मेळ साधत त्यांनी या संस्थेला ‘महाराष्ट्र शाहीर परिषद’ असे नाव दिले. शाहीर योगेश आणि शाहीर किसनराव हिंगे यांनी पुण्यात १९६८ साली ही संस्था स्थापन केली आहे आणि गेली सेहेचाळीस वर्षे परिषदेचे काम राज्यभर सुरू आहे.
शाहीर परिषदेचे अध्यक्षपद आता शाहीर दादा पासलकर यांच्याकडे आहे. शाहीर परिषदेच्या राज्यात तीस जिल्ह्य़ांत शाखा आहेत आणि दोन हजार शाहीर परिषदेचे सभासद आहेत. राज्यात सक्रिय असलेल्या शाहिरी फडांची संख्या दीडशे ते दोनशे इतकी आहे आणि या सर्वासाठी परिषद काम करते. महाराष्ट्राला शाहिरी परंपरा असली, तरी शाहिरी साहित्य संमेलन मात्र कधी भरवण्यात आले नव्हते. ही उणीवही शाहीर परिषदेने भरून काढली आणि २०११ मध्ये पहिले मराठी शाहिरी साहित्य संमेलन परिषदेने यशस्वी रीतीने भरवले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही कधी शाहिरीला स्थान मिळाले नव्हते. यंदा सासवडच्या संमेलनात पहिल्यांदा शाहिरांचा डफ खणखणला. शाहीर परिषदेचे आणखी एक पाऊल आता पुढे पडत आहे. परिषदेची स्वत:ची वास्तू पुण्यात झाली असून या वास्तूचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (१ मे) रोजी होत आहे आणि भविष्यात पुण्यात शाहिरी भवन बांधण्याचीही योजना परिषदेतर्फे आखण्यात आली आहे. याशिवाय शाहिरीच्या उत्पत्तीपासून ते आतापर्यंतचा प्रवास या विषयावरील माहितीचे संकलन व शब्दांकन असाही एक मोठा प्रकल्प दादा पासलकर यांनी हाती घेतला आहे.
महाराष्ट्राच्या लष्करातील सहभागासाठी महाराष्ट्रीय मंडळ
संपदा सोवनी, पुणे
टिळक रस्त्यावरील महाराष्ट्रीय मंडळाचे नामकरण करताना संस्थेच्या नावात ‘महाराष्ट्रीय’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरण्यात आला होता. महाराष्ट्रीय मुलांना लष्करात भरती होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारे ते ‘महाराष्ट्रीय मंडळ’ अशी या संस्थेची नामकथा आहे.
शि. वि. ऊर्फ शिवरामपंत दामले यांनी १९२४ मध्ये महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. टिळक रस्त्यावर असलेली ही संस्था आजही तितक्याच दिमाखाने उभी आहे. शिवरामपंत दामले यांचे नातू धनंजय दामले यांनी संस्थेच्या नामकरणाविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘‘माझ्या आजोबांनी या संस्थेचे नामकरण करताना त्यात ‘महाराष्ट्र’ हा शब्द जरूर असावा अशी काळजी घेतली होती. त्या काळी लष्करात भरती होणारी महाराष्ट्रीय मुले फार कमी होती. लष्करातील महाराष्ट्रीय मुलांची संख्या वाढावी ही मूळ इच्छा महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेमागे होती. या इच्छेला अनुसरून शिवरामपंत दामले यांनी मुलांच्या शारीरिक व बौद्धिक प्रगतीसाठी काम करणारी संस्था स्थापन करण्याचे ठरवले आणि १९२४ मध्ये महाराष्ट्रीय मंडळ स्थापन झाले. सुरुवातीला या शाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या शाळेबरोबरच तालीमही सुरू करण्यात आली. मलखांबाचे शिक्षणही देण्यात येऊ लागले. पुढे या संस्थेचा आणखी विस्तार झाला आणि इतरही अनेक सुविधा इथे सुरू करण्यात आल्या.’’
मराठी भाषेच्या जतनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद
मराठीसाठी काम करणाऱ्या संस्थांमधील एक अग्रगण्य संस्था म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. मराठीचे जतन व संवर्धनासाठी काम करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी सन १८७८ मध्ये ग्रंथकार संमेलनांची परंपरा सुरू केली. ग्रंथजतन आणि संपादन हा या संमेलनांचा प्रमुख उद्देश होता. १९०६ मध्ये या परंपरेतील चौथ्या ग्रंथकार संमेलनात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या स्थापनेची घोषणा केली होती.
परिषदेच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांनी या संस्थेच्या स्थापनेची कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘चौथे ग्रंथकार संमेलन नारायण पेठेत मळेकर वाडय़ात भरले होते. (सध्या या जागी राजहंस प्रकाशन आहे.) चौथ्या ग्रंथकार संमेलनाला लोकमान्य टिळकही उपस्थित होते. या संमेलनात न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था स्थापन होत असल्याची घोषणा केली. ही संस्था मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काम करेल असेही केळकर यांनी त्याच संमेलनात जाहीर केले. या संस्थेसाठी पन्नास सभासद जमले असल्याचेही त्यांनी सांगितले होते. अशा रीतीने २७ मे १९०६ रोजी मसापची स्थापना झाली. या वेळी लोकमान्य टिळकांना आशीर्वादपर भाषण करण्याची विनंती करण्यात आली होती. ‘संस्था सुरू करणे सोपे असते; पण संस्थेला कार्यकर्ते मिळणे अवघड असते. महाराष्ट्र साहित्य परिषदेला चांगले कार्यकर्ते मिळोत,’ असे आशीर्वाद लोकमान्यांनी दिल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.’’
अध्यापनात माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र ज्ञान महामंडळ
रसिका मुळ्ये, पुणे
आपली ओळख काय.. तर ‘महाराष्ट्रीय’, काम कुणासाठी करायचे.. महाराष्ट्रातील लोकांसाठी.. याच विचारातून अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या संस्थेला नाव देण्यात आले ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ!’ ज्याची ओळख आज ‘एमकेसीएल’ अशी आहे.
ऑगस्ट २०११ मध्ये एमकेसीएल सुरू झाले. अध्यापनामध्ये नव्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू झाली. संस्था सुरू होताना अर्थातच नाव काय, हा प्रश्न आला. मग संस्थेचा उद्देश काय, आपली ओळख काय, आपल्याला नेमके काम काय करायचे अशा अनेक मुद्दय़ांचा ऊहापोह सुरू झाला आणि त्यातून ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ हे नाव निश्चित झाले. शासनाच्या सहकार्यातून ही संस्था सुरू झाली हा एक मुद्दा होता. मात्र, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ या नावामागे प्रादेशिक किंवा भाषिक अस्मितेपेक्षाही संस्थेची ओळख, कार्यक्षेत्र दर्शवणे हा उद्देश होता, असे संस्थापकांपैकी एक असलेले डॉ. राम ताकवले यांनी सांगितले.
डॉ. ताकवले म्हणाले, ‘‘जगातील अनेक विद्यापीठांची नावे ही गावावरून किंवा त्याच्या प्रदेशावरून देण्यात आली आहेत. प्रत्येक नावाची एक ओळख असते. आम्हाला मराठी लोकांसाठी प्रामुख्याने काम करायचे आहे. म्हणून संस्थेचा विस्तार महाराष्ट्रापुरताच ठेवायचा असेही नाही; पण संस्थेची ओळख ही महाराष्ट्रातील संस्था अशी असावी, ती ओळख नावामधूनही दिसावी, या उद्देशाने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ असे नाव ठेवण्यात आले. एखाद्या प्रदेशाचे नाव देण्यामागे एक सामाजिक, सांस्कृतिक ओळखही असते. ती ओळख जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’’
महाराष्ट्र नाटकमंडळींची प्रेरणा  – महाराष्ट्र कलोपासक, पुणे
नटवर्य केशवराव दाते यांच्या ‘महाराष्ट्र’ नाटकमंडळी पासून प्रेरणा घेऊन हौशी कलाकारांसाठी सुरू झालेली संस्था म्हणजे ‘महाराष्ट्र कलोपासक, पुणे!’ महाराष्ट्रीय कलोपासक पुणे ही संस्था १९३६ साली नूमवि प्रशालेतील शिक्षकांनी एकत्र येऊन सुरू केली. सध्या पुण्यातील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करणारी संस्था ही या संस्थेची प्रमुख ओळख आहे. केशवराव दाते यांना आदर्श मानून कला क्षेत्रासाठी काहीतरी करायचे या ऊर्मीतून ही संस्था सुरू झाली. त्या वेळी दाते यांची ‘महाराष्ट्र नाटकमंडळी’ ही संस्था गद्य नाटकांसाठी नावाजलेली होती. त्याच धर्तीवर; पण हौशी कलाकारांसाठी संस्था सुरू करावी असा विचार ठरला आणि साहजिकच महाराष्ट्र नाटकमंडळीच्या नावाचा आधार घेऊन संस्थेच्या नावाचा विचार सुरू झाला.
‘कलेचा प्रसार’ हा उद्देश ठेवून संस्था सुरू केल्यानंतर मग फक्त नाटकाचाच विचार का? असा प्रश्न आला. ‘कलोपासक’ या शब्दामध्ये येणाऱ्या प्रत्येक कलेसाठी काम करण्याचा विचार संस्थापकांपैकी एक असलेल्या अप्पासाहेब वझे यांनी मांडला आणि मग ‘महाराष्ट्र कलोपासक’ असेच नाव देण्याचे निश्चित झाले. साधारणपणे १९४० च्या दरम्यान संस्थेची नोंदणी झाली. त्या वेळी नागपूर येथेही या नावाशी मिळतीजुळती अशी एक संस्था कार्यरत होती, त्यामुळे महाराष्ट्र कलोपासक, पुणे असे या संस्थेचे नामकरण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा