पुणे : तैवान येथे नुकत्याच पार पडलेल्या युवा आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्यपदकांसह १९ पदके मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. या एकोणीस पदकांपैकी ९ पदके महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी मिळवली. यामध्ये पुण्याच्या रायन सिद्दिकीने मिळविलेल्या सुवर्ण आणि वैष्णवी पवारच्या रौप्यपदकाचा समावेश आहे. स्पर्धेत यजमान तैवानने २१ पदकांसह पहिले स्थान पटकावले. तगडा कोरियाचा संघ ७ पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

तैवान येथे २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली. भारताच्या वैष्णवी पवार, ज्ञानेश्वरी गदादे, रायन सिद्दिकी, आदिती स्वामी, शर्वरी शेंडे, आदित्य गदादे, तेजल साळवे, मानव जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रिकर्व्ह आणि कम्पाऊंड या दोन्ही प्रकारातू नऊ पदकांची कमाई केली. यामध्ये ज्ञानेश्वरी गदादेच्या २१ वर्षांखालील वैयक्तिक रौप्य आणि सांघिक सुवर्णपदकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे तिचा भाऊ आदित्य गदादेने २१ वर्षांखालील गटातून सांघिक सुवर्णपदक मिळविले. जागतिक विजेती आदिती स्वामीला वैयक्तिक प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले, असले, तरी ती ज्ञानेश्वरी, अवनीत कौरसह सांघिक सुवर्णपदकाची मानकरी ठरली. महाराष्ट्राच्या खेळाडूंमधील पुण्यातील सात, साताऱ्यातील दोन, सोलापूरमधील दोन बुलढाण्यातील दोन खेळाडूंचा समावेश होता. महाराष्ट्राच्या बरोबरीने या यशात पुण्याचाही वाटा मोठा राहिला. यामधील बहुतेक खेळाडू पुण्यात सराव करतात. तर रायन सिद्दिकी, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे हे तीन खेळाडू पुणे आणि पिंपरीमधील आहेत.

हेही वाचा – जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले

पुण्याचा रायन सिद्दिकी २१ वर्षांखालील गटात सांघिक सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. वैष्णवीने याच गटातून सांघिक रौप्यपदक मिळविले. विशेष म्हणजे भारतीय मुलींनी उपांत्य फेरीत कोरियाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत यजमान तैवान विरुद्ध शूट-ऑफमध्ये भारतीय मुलींना सुवर्णपदक गमवावे लागले. या कामगिरीबाबत वैष्णवीशी संपर्क साधला असता तिने पदार्पणातच आंतरराष्ट्रीय यश मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. एकामागून एक फेरी जिंकल्यावर आत्मविश्वास मिळत गेला. उपांत्य फेरीत कोरियावर विजय मिळविल्यावर आत्मविश्वास दुणावला. मात्र, पाऊस आणि वाहत्या वाऱ्यांचे आव्हान पेलणे कठिण गेले. आपल्यापेक्षा सरस कोणीच नाही ही खूणगाठ मनात पक्की केली. इथपर्यंत आलो, तर आता मागे हटायचे नाही हे ठरवून खेळ केल्याने पदक मिळवू शकले, असे वैष्णवी म्हणाली.

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि स.प. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रणजित चामले यांनीही यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. हे सर्व खेळाडू खूप मेहनती असून, त्यांनी अशीच मेहनत आणि सराव कायम राखला, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवस ते वर्चस्व सिद्ध करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या यशाविषयी बोलताना चामले म्हणाले, महाराष्ट्रात आता लहानपणापासून मुले खेळत आहेत. त्यांची कौशल्य क्षमता आणि आत्मविश्वासात भर पडली आहे. सर्व सुविधा आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. शासनाने नोकरीची हमी दिली. एकूणच पोषक वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्राचा खेळाडू झपाट्याने प्रगती करत आहे.

हेही वाचा – हमीभावाने खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूट; जाणून घ्या, सोयाबीन, उडीद, मुगाला किती दर मिळतोय

केवळ खेळाडूच नाहीत, तर चंद्रकांत इलग, प्रविण सावंत, कुणाल तावरे, राम शिंदे, अनि सोनावणे आणि सुधीर पाटील असे चांगले प्रशिक्षकही महाराष्ट्रातच उपलब्ध असल्याचा फायदा या खेळाडूंना होत असल्याचेही चामले यांनी सांगितले.