२२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत परीक्षा, ऑनलाइन अर्जांसाठी ८ फेब्रुवारीची मुदत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता  चाचणी-२०२२ (टेट) ही ऑनलाइन परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार असून, आयबीपीएस या कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.  त्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष लागले होते. राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी परीक्षेचे वेळापत्रक परिपत्रकाद्वारे जाहीर केले.

हेही वाचा >>> इन्फोसिस हे पुण्याचं बाळ! नारायण मूर्ती यांची भावना

परीक्षा घेण्यासाठी परीक्षा परिषदेने आयबीपीएस या कंपनीची निवड केली आहे. https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/  या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांना ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज भरता येईल. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी ८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. तर १५ फेब्रुवारीपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून घेता येईल.  परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती, कालावधी याबाबतची अधिसूचना http://www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी दहावी, बारावी, पदविका, पदवी आदी शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता, अपंगत्व, राखीव प्रवर्गातील असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेले अद्ययावत रंगीत छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी, स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाइन अर्जात अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षेबाबत पुढील कार्यवाहीसाठी लघुसंदेश, ईमेलद्वारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता अचूक देणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

तर उमेदवारी रद्द!

ऑनलाइन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल, निकाल घोषित केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेली माहिती आणि मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader