पुणे : राज्यात महसूल विभागाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील पिकांची ऑनलाइन नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही नोंदणी ई-पीक पाहणी या मोबाइल ॲपमध्ये करता येते. शेतकरीच या उपयोजनमध्येे पिकांची माहिती तसेच शेतात उभ्या असलेल्या पिकांचे फोटो अपलोड करतात. सन २०२३-२४ या वर्षासाठी महसूल विभागाने केलेल्या ई-पीक पाहणी नोंदणीत आतापर्यंत राज्यात दीड कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी ॲपद्वारे केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी ‘स्मार्ट’ झाले असल्याचे महसूल विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
राज्यात वर्षभरात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात ई- पीक पाहणी ॲपद्वारे सुमारे ६३ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद झाली आहे. त्यानुसार ८० लाख ८१ हजार २१५ हेक्टर क्षेत्रापैकी ५१ लाख ५८ हजार ७९१ हेक्टरवर पीक पाहणी झाली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी सुरू असून खरीप हंगामात सर्व पिकांमध्ये सोयाबीन या पिकाची सर्वाधिक ५२ लाख २० हजार ३८३ हेक्टर एवढी नोंदणी झाली आहे.
राज्य शासनाच्या वतीने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात ’ई-पीक पाहणी’ची नोंद प्रत्येक वर्षी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक शेतकरी आणि तलाठी यांच्या स्तरावर ही नोंदणी करण्यात येते. राज्यात ई-पीक पाहणी ॲपद्वारे सध्या रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी सुरू आहे. खरीप हंगामातील पिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी दिली.
हेही वाचा : नाशिक : केवायसी अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळण्यास विलंब
दरम्यान, राज्यात खरीप हंगामात सोयाबीन ५२ लाख २० हजार ३८३ हेक्टर, कापूस ३० लाख ८० हजार ४१३ हे., भात १३ लाख ३१ हजार ७५१ हे., तूर पाच लाख ७१ हजार ९०२ हे. आणि मका पाच लाख ३८ हजार ३०९ हे. क्षेत्रावर नोंद झाली आहे. तर, रब्बी हंगामात हरभरा सहा लाख १७ हजार ७३१ हे., ज्वारी एक लाख ४७ हजार २८७ हे., गहू एक लाख २४ हजार ९७७ हे., कांदा एक लाख आठ हजार १३६ हे. आणि मका १६,०१३ हे. क्षेत्रावर नोंद झाली आहे.