राहुल खळदकर, लोकसत्ता

पुणे : परदेशातील ड्रॅगन फळ महाराष्ट्रातील मातीत रुजले असून गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळांची शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर लागवड सुरू केली आहे. कमी पाणी आणि खडकाळ जमीन असलेल्या भागांतील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. परदेशी मातीतील या ड्रॅगन फळाची लागवड नगर, सोलापूर, सातारा भागातील शेतकरी करत आहेत. फळांना मागणी मोठी असून दरही चांगला मिळत आहे.

ड्रॅगन फळांचा हंगाम जून महिन्यात सुरू होतो. नोव्हेंबर महिन्यापर्यंत हंगाम सुरू असतो. यंदा हंगामाच्या पहिल्या टप्यात ड्रॅगन फळांना चांगले दर मिळाले असून गतवर्षीच्या तुलनेत ड्रॅगन फळांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ड्रॅगन फळ आरोग्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. ड्रॅगन फळांचे सेवन केल्यास रक्तातील पेशी वाढतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळांना मागणी वाढत आहे.

ड्रॅगन फळांचा आकार आणि रंग आकर्षक असतो, असे मार्केट यार्डातील ड्रॅगन फळांचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

एकटय़ा पुण्याच्या मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज पाच ते दहा टन आवक होत असून लाल रंगाच्या एक किलो ड्रॅगन फळाचे दर  प्रतवारीनुसार ३० ते १५० रुपये आहेत. पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगन फळाचे दर ३० ते १०० रुपये आहेत. येत्या काही दिवसांत ड्रॅगन फळांची आवक आणखी वाढणार असून त्यानंतर दरात घट होईल.  एका फळाचे वजन साधारणपणे १०० व ते ६०० ग्रॅम असल्याचे सुपेकर यांनी सांगितले.

कमी पाणी आणि खडकाळ जमीन

गेल्या तीन ते चार वर्षांत नगर, सोलापूर, सातारा भागातील शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर ड्रॅगन फळांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. ड्रॅगन फळांना पाणी कमी लागते. खडकाळ जमिनीवर लागवड होते. पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत फळधारणा होते. नगर, सोलापूर परिसरातील ड्रॅगन फळांची चव चांगली आहे. परदेशातील ड्रॅगन फळ महाराष्ट्राच्या मातीत रुजले असून चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल वाढला आहे, असे मार्केट यार्डातील फळ व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी नमूद केले.

गुजरातमधील ड्रॅगनशी स्पर्धा

पुणे विभागातील शेतकऱ्यांकडून ड्रॅगनची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुजरातमधील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमधील ड्रॅगन फळ महाराष्ट्रातील फळापेक्षा आकाराने मोठे आहे. गुजरातमधील ड्रॅगन फळ चवीला सपक असते. त्या तुलनेत पुणे विभागातील ड्रॅगन फळ चवदार असून  पाच ते सहा दिवस टिकते. त्यामुळे किरकोळ बाजारातील विक्रेत्यांकडून महाराष्ट्रातील ड्रॅगन फळाला मागणी असते.

Story img Loader