पिंपरी : महापालिकेचे चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाच्या वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश देण्याच्या एक दिवस अगोदरच महामंडळाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून ताबा मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी १२ डिसेंबर रोजी प्राणी संग्रहालय हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. मात्र, ११ डिसेंबर रोजी महामंडळाने महापालिकेकडे ताबा मागितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : करोना काळानंतरचा मोठा बदल… ‘याच्या’ मागणीमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ!

चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये एमआयडीसीच्या सात एकर जागेमध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणी संग्रहालय आहे. ३० डिसेंबर १९८९ रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. सर्पोद्यान व प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम २०१६ मध्ये हाती घेण्यात आले. विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने २५ डिसेंबर २०१७ पासून प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी बंद आहे. प्राणिसंग्रहालयाचा विषय हिवाळी अधिवेशनातही गाजला. गेल्या सहा वर्षांत विविध ३६ प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप अधिवेशनात करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, प्राणी संग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

हेही वाचा >>> कुणी शहर कार्यालयासाठी जागा देता का जागा?… पुण्यातील सत्ताधारी भाजपवर ही वेळ का आली?

प्राणी संग्रहालयाचे टप्पा एक व दोनचे काम पूर्ण झाले आहे. टपा तीनमधील कामाच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सल्लागारही बदलण्यात आला आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ऑगस्ट २०२३ मध्ये केलेला पाहणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तसेच, आयुक्तांशी चर्चा करून वन विकास महामंडळाला पत्र पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे नियोजन आहे.

नागपूर येथील वन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला एन. यांनी हे पत्र पाठविले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार या संग्रहालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून ते पूर्ण करणे, पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन करणे, त्याप्रमाणे सेवा व सुविधा निर्माण करणे आदींबाबत चर्चा करण्यात यावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

वन विकास महामंडळाकडून महापालिकेला पत्र आले आहे. तिसऱ्या टप्प्यातील काम बाकी आहे. काम झाल्यानंतर संग्रहालयाचे संपूर्ण संचलन महामंडळ करणार आहे.

संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra forest development corporation letter to pcmc for bahinabai chaudhary zoo pune print news ggy 03 zws