पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याआधी तत्कालीन द्वैभाषिक राज्याच्या पोलीस सेवेत रुजू झालेले आणि राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक वसंत केशव सराफ (वय ८६) यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : सात नव्या पोलीस ठाण्याचे आज उदघाटन; ८१६ पदे, ६० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता

वसंत सराफ यांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे झाला. त्यांचे वडीलही पोलीस खात्यात नोकरीस होते. एम़. एस्सी. पदवीनंतर सराफ हे भारतीय प्रशासन सेवा परीक्षेत पहिला वर्ग मिळवून ते उत्तीर्ण झाले. पोलीस प्रशिक्षणानंतर त्यांची १९५८ मध्ये उपसहाय्यक अधीक्षक म्हणून सूरत येथे पहिली नियुक्ती झाली. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर सराफ महाराष्ट पोलीस सेवेचा घटक झाले. १९६६ मध्ये त्यांची केंद्रीय गुप्तचर संस्थेत अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीवर बदली झाली.१९७१ मध्ये त्यांना संशोधन आणि विश्लेषण शाखेत (रॉ)मध्ये नियुक्ती मिळाली. सीआयडीचे महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९६८ मध्ये ते सीआयडीचे आयुक्त झाले. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिल्यावर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती मिळाली. १ जानेवारी १९९० रोजी ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. ऑगस्ट १९९२ ला ते निवृत्त झाले.