पुणे : राज्यातील सहा महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी (३ ऑगस्ट) जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ६ ऑगस्टपर्यंतची मुदत असेल. आतापर्यंत २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे कोटय़ाअंतर्गत राखीव जागांद्वारे प्रवेश निश्चित झाले आहेत.

केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीमार्फत पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महापालिका क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील एकूण १ हजार ६७६ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील ५ लाख ७८ हजार जागांवर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. प्रवेश समितीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीसाठी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरण्यासाठी २७ जुलैची मुदत होती आणि ३ ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळण्यासाठी प्रवेश अर्जासाठी ३० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर आता पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार आतापर्यंत मुंबईतील १४ हजार २२६, पुण्यात ४ हजार ३५९, नागपूरमधील १ हजार ५८०, नाशिकमधील ७४६, अमरावतीच्या ९९२ विद्यार्थ्यांनी कोटय़ाअंतर्गत राखीव जागांद्वारे प्रवेश निश्चित केल्याचे दिसून येत आहे.

जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी बुधवारी सकाळी जाहीर करण्यात येईल. त्यात प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या पसंतीचा प्रवेश जाहीर होऊनही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांना एका फेरीसाठी प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जाईल.

मीना शेंडकर, सचिव, केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समिती

Story img Loader