पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या वाढली असून, त्यातील निम्मे रुग्ण गंभीर आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यामुळे या रुग्णांच्या उपचारांचा सरासरी खर्च ५ लाख रुपयांहून अधिक होत आहे. राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून या आजारावर उपचार होत आहेत. आता पुणे महापालिकाही गरीब रुग्णांच्या उपचाराचा खर्चात योगदान देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जीबीएस’ची रुग्णसंख्या ७३ वर पोहोचली असून, त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. सध्या १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सर्वसाधारणपणे या आजाराचा रुग्ण छोट्या रुग्णालयात गेला, तर त्याचा उपचारांचा खर्च सुमारे ५ ते ६ लाखांवर जातो. हाच खर्च मध्यम रुग्णालयात १० लाखांपर्यंत होतो आणि मोठ्या रुग्णालयात १० लाख रुपयांच्या पुढे जातो. यामुळे या आजाराचे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ‘जीबीएस’च्या रुग्णांवर २ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होतात. या आजाराच्या उपचारांचा खर्च अधिक असल्याने २ लाखांवरील खर्च कुठून करावयाचा, असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत. यामुळे महापालिकेने गरीब रुग्णांच्या उपचाराच्या खर्चात आर्थिक योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जीबीएस’च्या रुग्णांवर प्लाझ्मा आणि ‘आयव्हीआयजी’ या दोन प्रकारांचे उपचार होतात. त्यातील प्लाझ्मा उपचारांसाठीचा खर्च ३ ते ३.५ लाख रुपये असतो, तर आयव्हीआयजी उपचारांचा खर्च ४ ते ५ लाख रुपयांवर जातो. प्लाझ्मा उपचार पद्धतीत रुग्णाच्या शरीरातील दूषित प्लाझ्मा काढून तो बदलला जातो. याच वेळी ‘आयव्हीआयजी’ उपचारांमध्ये रुग्णाला ‘इम्युनोग्लोब्युलिन’ इंजेक्शन दिली जातात. या एका इंजेक्शनची किंमत २० ते २५ हजार रुपये असते. रुग्णाचे सरासरी वजन ६० किलो गृहित धरल्यास त्याला दिवसाला ५ ते ६ इंजेक्शन द्यावी लागतात. त्यामुळे एका दिवसाचा इंजेक्शनचा खर्चच लाखावर जातो, अशी माहिती हर्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र छाजेड यांनी दिली.

शहरातील छोट्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागातील उपचारांचा खर्च दिवसाला १० हजार रुपये आणि व्हेंटिलेटरचा खर्च दिवसाला १० हजार रुपये आहे. यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णाला ५ दिवसांसाठी सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च होतो. व्हेटिंलेटरवरील रुग्णाला ५ दिवसांसाठी सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे त्याचा एकूण उपचारांचा खर्च १ लाख रुपयांवर जातो. मध्यम रुग्णालयांमध्ये हा एकूण खर्च २ लाख रुपये, तर मोठ्या रुग्णालयांमध्ये ५ लाखांच्यावर जातो, असेही डॉ. छाजेड यांनी स्पष्ट केले.

‘जीबीएस’वरील उपचारांचा खर्च

औषधे – ३.५ ते ४ लाख रुपये

अतिदक्षता विभाग – ५० हजार रुपये

व्हेंटिलेटर – ५० हजार रुपये

एकूण खर्च – ४.५ ते ५ लाख रुपये

 ‘जीबीएस’च्या रुग्णांवरील उपचाराचा खर्च जास्त आहे. त्यामुळे गरीब रुग्णांच्या उपचारांच्या खर्चात आर्थिक योगदान देण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली आहे. गेल्या दोन आठवड्यांत महापालिकेच्या हद्दीत आढळून आलेल्या रुग्णांना याचा फायदा मिळेल. – डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government along with municipal corporation will help in guillain barre syndrome treatment cost pune print news stj 05 zws