पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात नवीन अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारतीसाठी गृह विभागाने शनिवारी १९३ कोटी ८० लाख ५९ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन इमारतीचे काम केले जाणार आहे.
पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. पोलीस ठाण्यांची संख्या वाढली असून, पुणे पोलीस आयुक्तालयातील इमारत अपुरी पडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर पुणे पोलीस आयुक्तालयात नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयातील सध्याची इमारत कामकाजाच्या दृष्टीने अपुरी पडत होती. त्यामुळे नवीन इमारत बांधण्यास परवानगी, तसेच निधी उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी २४२ कोटी ९९ लाख ९१ हजार ११५ रुपये अपेक्षित असल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले होते. प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाजपत्रक पाठविण्यात आले होते.
हेही वाचा…यंदा ‘रेडीरेकनर’च्या दरात वाढ? शहरी भागात ९ टक्के, ग्रामीण क्षेत्रात ७ टक्के दरवाढ प्रस्तावित
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत १९३ कोटी ८० लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याबाबतचे आदेश शनिवारी देण्यात आले. पोलीस आयुक्तालयाचा भूखंड गृह विभाग, महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. याबाबत खात्री केल्यानंतर काम सुरू करण्यात यावे. कामाच्या निविदा मागविण्याचा आधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरू करण्यात येऊ नये, अशा अटींचा समावेश आहे.