समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामे येत्या वर्षभरात पूर्ण होण्याचा दावा विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आला असला तरी योजनेचे सुरू असलेले संथ गतीने काम आणि विविध अडचणी लक्षात घेता ही योजना वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सुनील कांबळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. आमदार भीमराव तापकीर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी ही योजना सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सभागृहात दिली आहे. प्रत्यक्षात मात्र योजनेमध्ये असंख्य अडथळे असल्याने योजनेचे काम पूर्ण मुदतीमध्ये पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे.

हेही वाचा >>> पुणे: प्रवाशाकडून पीएमपी वाहकाच्या अंगठ्याला चावा; हडपसर भागातील घटना; प्रवासी अटकेत

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८२ साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यापैकी केवळ ४२ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. २२ टाक्यांची कामे येत्या काही दिवसांत होतील, असा दावा करण्यात आला आहे. तर अकरा टाक्यांसाठी जागा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. जागा मिळत नसल्याने या टाक्या रद्द करण्यात येणार असल्याचे महापालिकेने पत्राद्वारे जलशक्ती मंत्रालयाला कळविले आहे. अनेक टाक्यांच्या उभारणीसाठी जागा मिळत नसल्याने वर्षभरात साठवणूक टाक्यांची कामे पूर्ण होण्याबाबत प्रशासकीय पातळीवरच संदिग्धता आहे.

हेही वाचा >>> Jaykumar Gore Car Accident: “दादा वाचवा… वाचवा! बघा अपघात…”, अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला सविस्तर घटनाक्रम

या योजनेमध्ये प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, पंपिंग स्टेशन्स बांधणे तसेच नागरिकांच्या नळजोडांवर जलमापक बसविणे अशी कामे प्रस्तावित आहेत. पाण्याच्या साठवण टाक्या बांधण्याकरिता एक निविदा, मुख्यदाब नलिका टाकण्याकरीता एक निविदा आणि शहराच्या जलशुध्दीकरण केंद्रनिहाय पाच निविदा, अशी ७ निविदांची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची निविदा मान्य झाली असून कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने एकूण ११ सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे बांधण्यात येणार आहेत. त्यांची एकूण क्षमता ३९६ दशलक्ष लिटर एवढी आहे. तसेच योजनेअंतर्गत ५५ किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी नायडू, भैरोबा नाला, धानोरी, वडगांव सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government assurance to complete water supply scheme within a year pune print news apk13 zws
Show comments