मनोज मोरे, एक्सप्रेस वृत्त
पुणे : येथील ‘ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट’चे (पूर्वीचा ओशो किंवा-रजनीश आश्रम) संचालन करणाऱ्या ‘ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन’ला (ओआयएफ) कोरेगाव पार्क या उच्चभ्रू परिसरातील दोन भूखंड विक्रीसाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईतील सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने या संदर्भातील अर्ज नाकारला आहे. या विक्री व्यवहारास दिवंगत आध्यात्मिक गुरू ओशोंच्या शिष्यांच्या एका गटाचा तीव्र विरोध आहे.
हेही वाचा >>> इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनात घट
‘ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन’ने (ओआयएफ) ‘ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट’मधील सुमारे नऊ हजार ८०० चौरस मीटरचे दोन भूखंड विकण्याची परवानगी मागितली होती. या भूखंडांची उद्योगपती राहुल बजाज यांच्या कुटुंबाच्या विश्वस्त मंडळाला (ट्रस्ट) १०७ कोटींना विक्री होणार होती. मात्र, ओशोंच्या शिष्यांच्या बंडखोर गटाने या व्यवहारास तीव्र आक्षेप घेतला होता. ‘ओआयएफ’चे विश्वस्त आध्यात्मिक गुरू ओशोंचा आश्रमरूपी वारशाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा या गटाचा आरोप आहे. या विक्री व्यवहारास परवानगी नाकारताना सहधर्मादाय आयुक्त आर. यू. मालवणकर यांनी ७ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात ‘राजीवनयन राहुलकुमार बजाज आणि ऋषभ फॅमिली ट्रस्ट’कडून मिळालेली ५० कोटीं रुपयांची आगाऊ रक्कम (इसारा) व्याजाशिवाय परत करावी, असे नमूद केले आहे.