पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळले आहेत. अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने आरोग्य विभागाने शीघ्र कृती पथकाची स्थापना केली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या संशयित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ नोंदविण्यात आली आहे. हे सर्व रुग्ण शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. एकूण २४ संशयित रुग्ण असून, त्यातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर, ८ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल मिळेपर्यंत हे रुग्ण कोणत्या आजाराचे हे स्पष्ट करता येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी याप्रकरणी शीघ्र कृती पथक स्थापन करण्याचा आदेश काढला आहे.
या पथकामध्ये राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब तांदळे, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते आणि औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नागनाथ रेडेवार, राज्य साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू सुळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. अभय तिडके, राज्य साथरोगतज्ज्ञ डॉ. भालचंद्र प्रधान, पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. अमोल मानकर यांचा समावेश आहे.
नेमके रुग्ण किती?
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ५ पुणे महापालिकेच्या हद्दीतील आहेत. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील २, ग्रामीण भागातील १६ आणि जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सर्वाधिक १० रुग्ण दाखल असून, पूना हॉस्पिटल ५, काशीबाई नवले रुग्णालय ४, भारती रुग्णालय ३, सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन) आणि अंकुरा हॉस्पिटल (औंध) येथे प्रत्येकी १ असे रुग्ण दाखल आहेत. यातील काशीबाई नवले रुग्णालयातील १ आणि भारती रुग्णालयातील १ असे एकूण २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याचबरोबर ८ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.