पुणे : शिक्षण विभागात उपसंचालक पदावर कार्यरत अधिकाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या निवडसूचीनुसार शिक्षण सहसंचालक व समकक्ष पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण दहा अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे.

हेही वाचा >>> शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा… काय आहे निर्णय?

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार सुधाकर तेलंग यांची लातूर विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी, डॉ. सुभाष बोरसे यांची नाशिक विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी, राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी, अर्चना कुलकर्णी यांची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालकपदी, राजेंद्र अहिरे यांची मुंबई विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी, श्रीराम पानझाडे यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या सहसंचालकपदी, अनिल साबळे यांची छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी, रमाकांत काठमोरे यांची प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या सहसंचालकपदी, शिवलिंग पटवे यांची नागपूर विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी पदोन्नती झाली आहे. तर संदीप पटवे यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> शहरबात : मतदानाचा टक्का वाढणार का ?

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुमती याचिकेच्या अंतिम निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा, सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तीस दिवसांत पदोन्नतीच्या पदावर रूजू होण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.