पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी फिरते पथक हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत संबंधित जिल्ह्यांमध्ये एक बस फिरणार असून, प्रत्येक बालकाला त्याच्या वयोगटाप्रमाणे आहार आणि शैक्षणिक मदत मिळवून दिली जाणार आहे.
महिला आणि बालविकास विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. स्त्यावर राहणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक हा नावीन्यपूर्ण एकात्मिक प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. तसेच प्रकल्पासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सहा महिन्यांसाठी हा प्रकल्प राबवण्यात येईल. जिल्ह्यातील, शहरात रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत बस फिरवण्यात येईल.
हेही वाचा >>> सांगली: सरपंचपद खुले असणाऱ्या ठिकाणी उपसरपंचासाठी ओबीसींना संधी मिळावी
प्रकल्पाच्या अंमबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांमध्ये २५ मुलांच्या क्षमतेची बालस्नेह बस उपलब्ध करून त्यावर महिला आणि बालविकास विभाग अंतर्गत फिरते पथक असे लिहिलेले असावे. त्या बसला सीसीटीव्ही कॅमेरा आणि ट्रॅकिंग प्रणाली असणे आवश्यक आहे. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने हा प्रकल्प राबवण्यात येईल. प्रत्येक बससाठी एक समुुपदेशक, शिक्षक, चालक आणि काळजीवाहक या चार कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करावी. त्यातील दोन कर्मचारी महिला असाव्यात. प्रकल्पाअंतर्गत वाहन कोणत्या भागात फिरणार आहे याची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला द्यावी.
समुपदेशक आणि शिक्षक यांनी मुलांचा सामाजिक अन्वेषण अहवाल जिल्हा आणि बालविकास अधिकाऱ्याला सादर करावा. मुलांना शैक्षणिक साहित्य, गाणी, चित्रकला, नृत्य, गोष्टी या द्वारे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करून जवळच्या शासकीय शाळेत, सहा वर्षांखालील मुलांना अंगणवाडीमध्ये दाखल करण्याचे प्रयत्न करावेत. मुलांना रुचकर आणि पोषक अन्न देण्यात यावे. मुलांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक ते उपचार करावेत. संबंधित मुलांचे आधार कार्ड काढावे, असे नमूद करण्यात आले आहे.