आधार केंद्र आणि यंत्रांच्या कमतरतेमुळे आधार कार्ड काढताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आधार केंद्रातील यंत्रचालकांची अपुरी संख्या आणि बिघडलेल्या यंत्रांमुळे आधार कार्ड काढताना नागरिकांना धावाधाव करावी लागत असल्यामुळे यंत्रचालकांची नियुक्ती आणि यंत्रांची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. आधार केंद्रांसाठी १०० चालक नेमण्याचा आणि ५४ बिघडलेली यंत्रे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्त करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
शहर आणि जिल्ह्य़ाच्या परिसरात आधार केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे प्रत्येक गोष्टीसाठी आधारची सक्ती केली जात असताना आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे. या पाश्र्वभूमीवर दोन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचारी आणि यंत्रांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
‘आधारकार्ड संदर्भात उद्भवलेली ही परिस्थिती महाऑनलाईच्या कारभारामुळे निर्माण झाली आहे. महाऑनलाईनने २७ यंत्रचालक काळ्या यादीत टाकले आहेत. सध्या शहरात ९६ केंद्रे सुरु आहेत. राज्य शासनाकडे नवीन यंत्रचालक नेमण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महाऑनलाईन ही सरकारी कंपनी आहे. पूर्वी सीएससी, एनटीएसटी आणि इन्फ्राटेक या खासगी कंपन्यांडून काम करण्यात येत होते. त्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये केंद्र सुरु करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. या कंपन्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये केंद्र सुरू करण्यास होकार
दर्शविला आहे. त्यांच्याकडे असलेले यंत्रचालक नेमण्याचा हा प्रस्ताव आहे,’ असे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.सध्या ५४ यंत्रे नादुरुस्त आहेत. ती महाऑनलाईनची असल्यामुळे दुरुस्तीचे काम त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याडून हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या किंवा सेतू समितीच्या निधीतून यंत्रांची दुरुस्ती करण्याचे विचाराधीन आहे. तसा प्रस्तावही राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.
नव्याने यंत्रचालक आणि ५४ यंत्र मिळाल्यास आधारकार्ड काढण्यातील अडचणी दूर होऊ शकतील, असा दावाही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.