पुणे : राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागात सरळसेवेने २१९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. समाजकल्याण आयुक्तालयातील वर्ग ३ या संवर्गातील विविध पदे सरळसेवेद्वारे भरली जाणार आहेत. त्यात वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदाच्या पाच जागा, समाजकल्याण निरीक्षक या पदाच्या ३९ जागा, गृहपाल (महिला) या पदाच्या ९२ जागा, गृहपाल (सर्वसाधारण) ६१ जागा, उच्च श्रेणी लघुलेखक या पदाच्या दहा जागा, निम्नश्रेणी लघुलेखक या पदाच्या तीन जागा, तर लघुटंकलेखक या पदाच्या नऊ जागांचा समावेश आहे. 

हेही वाचा >>> शहरबात: ‘ससून’च्या दुखण्याने ‘बी.जे.’ला कळा!

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. मात्र, जाहिरातीत नमूद नसलेले प्रवर्ग, समांतर आरक्षणासाठीची पदे उपलब्ध होण्याची, पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमधील प्रत्येक पदासाठी निश्चित केलेली पात्रता, वयोमर्यादा स्पष्ट करण्यात आली आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.

हेही वाचा >>> डेक्कन कॉलेजची ‘विरासत’ आता ऑनलाइन; विद्यार्थी, अभ्यासकांना मोठी संधी

उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादीत समावेश होण्यासाठी उमेदवाराला परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यासाठीची दोनशे गुणांची परीक्षा संगणक आधारित असणार आहे. त्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश आहे. निवड समितीची तयार केलेली निवडसूची एका वर्षासाठी विधीग्राह्य राहील असे नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करतानाच परीक्षा केंद्र निवडणे आवश्यक आहे. केंद्र बदलाची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. एखादे केंद्र कार्यान्वित होऊ न शकल्यास किंवा एखाद्या केंद्रावर उमेदवारांना परीक्षा देण्याची क्षमता ओलांडली गेल्यास ते केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या परीक्षा केंद्रावर करण्यात येईल. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करताना छेडछाड केलेले, बनावट तपशील, माहिती लपवल्याचे परीक्षेवेळी किंवा त्यानंतरच्या निवडप्रक्रियेत उघडकीस आल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी खटला भरणे, अपात्र ठरवण्याची कारवाई करण्यात येईल. निवडीनंतर ही बाब निदर्शनास आल्यास सेवा समाप्त करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.