पुणे : राज्यात पुण्यासह काही भागांत दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे अतिसाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जीबीएसच्या उद्रेकानंतर महिनाभराने राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
राज्यात अतिसारासह जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे हे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुख्य सचिवांनी पुणे विभागातील जीबीएसचा प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रामध्ये शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी संबंधित यंत्रणांना तत्काळ कार्यवाही करण्यासही सांगितले होते. त्यानुसार, आता पाणीपुरवठा विभागाने राज्यात शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. तसेच राज्य पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयाला याबाबतचा एकत्रित मासिक अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला घरगुती नळ जोडणीद्वारे किमान ५५ लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती शुद्ध पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच, जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अंतर्गत ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी, असे निर्देश परिपत्रकात दिले आहेत.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत गावांतील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची आणि घरगुती नळ जोडणीद्वारे पुरवठा करण्यात योणाऱ्या पाण्याची (किमान दोन नमुने) रासायनिक तपासणी वर्षातून एकदा व जैविक तपासणी वर्षातून दोनदा प्रयोगशाळेमध्ये करून घ्यावी. तसेच तपासणीनंतर बाधित पाणी नमुन्यांवर गावस्तरावर उपाययोजना करून प्रयोगशाळेत फेरतपासणीसाठी पाठवावेत. पिण्याच्या पाण्याच्या चाचणीचा निकाल योग्य येईपर्यंत उपाययोजना करून पाणी तपासणी करावी, असे निर्देशही परिपत्रकात देण्यात आले आहेत.
अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची तंबी
जीबीएसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग यांनी समन्वयाने परिपत्रकातील सूचनांची अंमलबजावणी करावयाची आहे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पुरवठा करण्याबाबत दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. क्षेत्रीयस्तरावरील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत अधिक दक्ष राहावे. याबाबतीत निष्काळजीपणा अथवा कुचराई झाल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल, असेही परिपत्रकात नमूद केले.
शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना
– प्रतिव्यक्ती प्रतिदिन ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा.
– जलस्त्रोतांची वर्षातून एकदा रासायनिक तपासणी करावी.
– जलस्त्रोतांची वर्षातून दोनदा जैविक तपासणी व्हावी.
– प्रत्येक ग्रामपंचायतीत जैविक क्षेत्रीय तपासणी संच बसवावा.
– गावातील जलस्त्रोतांची तपासणी प्रशिक्षित स्वयंसेवकामार्फत करावी.
– भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळांकडूनही पाण्याची तपासणी करावी.