पुणे : हजारो कोटींच्या बहुचर्चित मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेबाबत पर्यावरण अभ्यासकांनी आक्षेप उपस्थित केल्याने राज्य शासनाने योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र त्यानंतरही योजनेची कामे रेटण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. राज्य शासनाने तोंडी आदेश दिल्याने कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधित ठेकेदारांकडून नदीकाठ सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठाचे पुनरूज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे नियोजित आहे. त्याअंतर्गत एकूण ४४ किलोमीटर लांबीचा नदीकाठ सुशोभीत होणार आहे. नदीचे खोलीकरण, नदीकाठी उद्याने, छोटी मैदाने, जॉगींग ट्रॅक, सायकल मार्ग, विरंगुळा केंद्र अशी कामे याअंतर्गत प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यानच्या नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवा हा सात किलोमीटर लांबीचा नदीकाठ सार्वजनिक खासगी लोकसहभागातून विकसित केला जाईल. मात्र योजनेच्या प्रारंभापासून पर्यावरणप्रेमी आणि संस्थांनी योजनेबाबत काही आक्षेप नोंदविले आहेत. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची १२ मार्च रोजी मुंबई येथे बैठक झाली होती. या बैठकीत योजनेच्या कामांना तात्पुरती स्थगिती देताना जलसंपदा विभागाने संयुक्त बैठक घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले होते.

या बैठकीनंतर महापालिका आणि जलसंपदा विभाग यांची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी महापालिका अधिकारी आणि योजनेच्या सल्लागाराला आक्षेपांबाबतचे ठोस खुलासे करता आले नाहीत. त्यामुळे खुलासे करण्यासाठी महापालिकेने सात दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत उलटून अकरा दिवस झाल्यानंतरही महापालिकेने अद्यापही त्याबाबचे सादरीकरण स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना केलेले नाही. मात्र अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही, अशी अजब भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती. पर्यावरणप्रेमी, अभ्यासकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्याऐवजी योजनेची कामे रेटून नेण्याचा प्रकार महापालिका प्रशासनाकडून झाला आहे. त्यानुसार बंडगार्डन ते संगमवाडी या दरम्यानच्या नदीकाठाचे सर्वेक्षण करण्याची सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आली असून पंधरा दिवसांत सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील कामे

बंडगार्डन ते संगम पूल या दरम्यान ३६२ कोटींची कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या स्तरावर ही कामे होणार असून सुशोभीकरण, सायकल मार्गाची उभारणी, संगमघाट परिसरातील पुरातन वास्तूंना धक्का न लावता सुशोभीकरण, सीमािभती, ताडीवाला रस्ता परिसरात संरक्षक भिंती, विविध देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड, नदीपातळीची खोली वाढविणे अशी विविध कामे या टप्प्यात होणार आहेत.

कामाचे टप्पे

मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत ४ हजार ७२७ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आराखडा महापालिकेकडून करण्यात आला असून पहिल्या तीन टप्प्यांची कामे करण्यास महापालिकेच्या मुख्य सभेनेही मान्यता दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी महापालिका सातशे कोटी रुपयांचा निधी देणार असून उर्वरित दोन टप्पे सार्वजनिक खासगी लोकसहभागातून (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत. संगमवाडी ते बंडगार्डन या साधारण चार किलोमीटर लांबीच्या अंतराची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील अडीच वर्षांत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर सार्वजनिक खासगी लोकसहभागातून पुढील टप्पा राबविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

Story img Loader