राधाकृष्ण विखे यांची टीका
दुष्काळ निवारणाबाबत आपत्ती व्यवस्थापनात सरकार कमी पडले आहे. आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांकडे सरकारने दुर्लक्ष केले. न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर सरकारला जराशी जाग आल्यासारखी वाटत असली तरी दुष्काळाबाबत सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. जनतेचा आक्रोशच त्यांना आता जाग आणेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे यांनी सरकारवर शनिवारी टीका केली. शिवसेना मित्रपक्ष आहे, सरकारचा घटक आहे. तरीही सेना सरकारला नालायक म्हणते, पण यामुळे त्यांचे मंत्रीही नालायकच ठरतात, असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.
संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी विखे शनिवारी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारला दुष्काळाची समस्या नीट हाताळताच आलेली नाही. योग्य त्या योजनांची आखणी करता आलेली नाही. केवळ बडबड करण्यात त्यांनी वेळ दवडला. त्यामुळे त्यांचे निर्णय सतत चुकत गेले आणि अपयश आले. आम्ही काहीही सुचवले तर त्यांना त्यात राजकारण दिसते. सध्या सेना-भाजप या दोन पक्षांमध्ये सतत तू तू मं मं सुरू आहे. सरकारला अस्थिर करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळाबाबत सरकारला आलेले अपयश हे सेनेचेही अपयशच आहे. शिवसेना सरकारची घटक आहे. सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करणे हे त्यांचे नाटकच आहे.
खासदार रामदास आठवले म्हणाले, की दुष्काळाबाबत सरकारने त्वरित पावले उचलावीत, जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब वाचवण्याचा प्रयत्न करावा आणि माणसांप्रमाणेच जनावरांनाही कायमस्वरुपी पाणी कसे उपलब्ध होईल याचा विचार करावा, अशा उपाययोजना सुचवणारे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले आहे. या कामासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत.

Story img Loader