पुण्यात आज ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. या स्पर्धेला कुस्ती चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, अंतिम सामना सुरू होण्या अगोदर या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना एक आनंदाची बातमी दिली. आपल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारने कुस्तीपटूंचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ ब्रिजभुषण सिंह यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली, की आपल्या सर्वांचे आदरणीय, प्रेरणापुरुष कै. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून दिल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये मेडल मिळवणाऱ्या मल्लांना तयार करणाऱ्यांमध्ये मागे राहिला का? अशी शंका येते. म्हणून ब्रिजभूषण सिंह मी तुम्हाला आश्वास्त करू इच्छितो की, महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि आम्ही तुमच्या मदतीने अशाप्रकारचे खेळाडू तयार करू, की येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा कोणता ना कोणता मल्ल, कुस्तीपटू हा महाराष्ट्राचा असेल. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि आमचे क्रीडामंत्री गिरीश महाजन निश्चितपणे यासाठी पुढाकार घेतील.”
याचबरोबर “ या निमित्त मुरलीधर मोहोळ आणि रामदास तडस यांनी मागणी केली आहे आणि हे खरच आहे की, आपल्या कुस्तीपटूंना आपण अत्यल्प मानधन देतो व मागील दोन वर्षांपासून तेही बंद आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी व क्रीडामंत्र्यांशी चर्चा केली आणि आपण एक ठरवलं, आपल्या राज्यात ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धा यामध्ये जे खेळतात त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण मानधन देतो. आता ते मानधन २० हजार करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घोषित करूया. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद यांना केवळ चार हजार रुपये मानधन आपण देतो, ते आता १५ हजार रुपये मानधन हे देण्याच निर्णय आज या ठिकाणी आपण घोषित करूया.” असंही फडणवीसांनी यावेळी जाहीर केलं.
याचसोबत “अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटूंना त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण देतो, त्यांनाही २० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय आपण करूया. याशिवाय आमचे जे वयोवृद्ध खेळाडू आहेत, यांना केवळ अडीच हजार रुपये आपण देतो त्यांनाही साडेसात हजार रुपये म्हणजे तीनपट वाढून मानधन देण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी तयार करूया. म्हणजे जेवढे आपले खेळाडू आहे यांचं मानधन हे तीन पटीने किंवा त्याही पेक्षा अधिक वाढवण्याचा निर्णय आज या निमित्त आपण करतो आहोत.” असंही फडणवीस म्हणाले.
पाहा व्हिडीओ –
याशिवाय, “ या पाठीमागची भावना एवढीच आहे, की आमचे खेळाडू मेहनत करतात. कुस्तीमध्ये मेहनतही लागते आणि खुराकही लागतो. या दोन्ही गोष्टींसाठी मोठ्याप्रमाणात खर्च होतो. सामान्य कुटुंबातील खेळाडू मेहनतीने कुस्तीपटू होतात. त्यामुळे त्यांना काहीना काही मदत ही सरकारच्यावतीने मिळाली पाहिजे, म्हणून आपण हा मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे. एवढच नाही तर येत्या काळात जसं मागच्या काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरी आपण दिली. अशाचप्रकारे आमच्या खेळाडूंना विविध ठिकाणी नोकरी, संधी देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्यावतीने निश्चितपणे केलं जाईल.” असं फडणवीसांनी शेवटी सांगितलं.