पुणे : यंदाच्या द्राक्ष हंगामात राज्यातून उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देशांसह जगभरातील ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ७२ हजार टनांनी निर्यातीत वाढ झाली आहे. कृषी खात्याच्या फलोत्पादन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशातून अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देशांसह जगभरातील एकूण पन्नास देशांना ३४.६१ कोटी रुपये किमतीची सुमारे ३ लाख ४३ हजार ९८२ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीत राज्याचा वाटा ९६ टक्के असून, राज्यातून ३३.९५ कोटी रुपये किमतीच्या ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ७२ हजार टनांनी निर्यातीत वाढ झाली आहे.
मागील वर्षाच्या द्राक्ष हंगामात देशातून २५.४३ कोटी रुपये किमतीची २ लाख ६७ हजार ९५० टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यांपैकी राज्यातून २४.८७ कोटी रुपये किमतीची २ लाख ५२ हजार ०५१ टन द्राक्षांची निर्यात झाली होती.
हेही वाचा : पिंपरी पोलिसांकडून आणखी दोन टोळ्यांवर ‘मोक्का’, आतापर्यंत ९८ गुन्हेगारांवर कारवाई
इस्रायल – पॅलेस्टाईन युद्धामुळे लाल समुद्रातून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे आफ्रिकेला वळसा घालून वाहतूक करावी लागली. त्यामुळे द्राक्ष निर्यातीच्या खर्चात मोठी वाढ झाली होती. तरीही अमेरिका आणि युरोपला यंदा उच्चांकी निर्यात झाली. यंदा भारतातून गेलेली जहाजे प्रामुख्याने नेदरलँडच्या किनारपट्टीवर दाखल झाली. तिथून गरजेनुसार रस्तामार्गे संपूर्ण युरोपात द्राक्ष वाहतूक झाली. यंदा युरोपला १ लाख ३२ हजार टन निर्यात झाली, मागील वर्षी युरोपला ८३ हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती. युरोपला होणाऱ्या निर्यातीतही ४९ हजार टनांनी निर्यातीत वाढ झाली आहे.
देशातून दर वर्षी सरासरी अडीच लाख टन द्राक्ष निर्यात होते. यंदा निर्यातक्षम द्राक्षांची उपलब्धता चांगली होती. दरही चांगला मिळाला, त्यामुळे उच्चांकी निर्यात झाली आहे. वाहतुकीत अडथळे होते. वाहतुकीच्या दरातही वाढ झाली होती. तरीही युरोपला चांगली निर्यात झाली आहे. वाहतुकीत अडथळे नसते, तर यंदा द्राक्ष निर्यात साडेतीन लाख टनांवर गेली असती.
अक्षय सांगळे, द्राक्ष निर्यातदार, निफाड
यंदाच्या द्राक्ष निर्यातीचे आकडे (टनांमध्ये)
देशातून झालेली निर्यात – ३ लाख ४३ हजार ९८२ टन
राज्यातून झालेली निर्यात – ३ लाख २४ हजार ४४१ टन
युरोपला झालेली निर्यात – १ लाख ३२ हजार टन