लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत पर्यटकांना, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी रेल्वेने भारत गौरव यात्रा सुरू केली आहे. मात्र, या यात्रेत महाराष्ट्राला नगण्य स्थान देण्यात आले आहे. या यात्रेत उत्तर आणि दक्षिणेतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर भर देण्यात आल्याने महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना डावलले जात असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत भारत गौरव यात्रा सुरू केली आहे. देशातील अनेक ठिकाणांहून धार्मिक पर्यटनासाठी रेल्वे मंत्रालयाकडून भारत गौरव यात्रा सुरू आहे. ही यात्रा पुण्यातून २८ एप्रिलला सुरू झाली. त्यात उत्तर भारतातील पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. दुसरी यात्रा ११ मेपासून सुरू होत आहे. उत्तर भारतातील आग्रा, अमृतसर, हरिद्वार, मथुरा, ऋषिकेश, उज्जैन आणि वैष्णोदेवी येथील स्थळांचा समावेश आहे.
हेही वाचा… “…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान
मुंबईतून २३ मे रोजी सुरू होणाऱ्या भारत गौरव यात्रेत बंगळुरू, कन्याकुमारी, मदुराई, म्हैसूर, रामेश्वरम, तिरुअनंतपुरम, तिरुपती या दक्षिणेतील धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचा समावेश असलेली केवळ एकच भारत गौरव यात्रा आहे. तिरुअनंतपुरममधून सुरू होणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर, शिर्डी या फक्त तीन स्थळांचा समावेश आहे.
हेही वाचा… येरवड्यात गुंडांची दहशत; वाहनांची तोडफोड
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, गड-किल्ले आहेत. रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीने धार्मिक आणि पर्यटन स्थळांचे विशेष पॅकेज तयार करून राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांच्यामार्फत आम्ही रेल्वे मंत्र्यांकडे करणार असल्याचे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निखिल काची यांनी सांगितले.
रेल्वे अधिकाऱ्यांचे आयआरसीटीसीकडे बोट
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भारत गौरव यात्रेबाबत विचारणा केली असता त्यांनी आयआरसीटीसीकडे बोट दाखवले. यात्रेचे नियोजन आयआरसीटीसीकडून केले जाते. यात्रेचा मार्ग आणि ठिकाणेही त्यांच्याकडून निश्चित केली जातात. त्यात रेल्वे विभागाचा हस्तक्षेप नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.