पुणे : खासगी रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी वाढल्याने राज्य पातळीवर खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत सुमारे ७१४ खासगी रुग्णालयांची तपासणी केली आहे. यात तब्बल १० टक्के रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाने महिनाभरात सुमारे ७१४ रुग्णालयांची तपासणी केली. त्यात ७६ रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याची बाब निदर्शनास आली. या रुग्णालयांना आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार नोंदणी झाली आहे का, याची तपासणी केली जात आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांची निकषाप्रमाणे संख्या आणि रुग्णालयाबाहेर लावलेले दरपत्रक या बाबींची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णालयाकडील अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबद्दल माहिती घेतली जात आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी सूर्यकांत देवकर यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या तपासणी मोहिमेत खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणि किमान एक रुग्णशय्या असलेल्या रुग्णालयांचा समावेश आहे. याचबरोबर ॲलोपथी, आयुष, युनानी, नॅचरोपथी यासह सर्व शाखांच्या रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. रुग्ण २४ तास दाखल करून घेतला जात नाही, अशा डे केअर सेंटरचा यात समावेश नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय आरोग्य अधिकारी, परिचारिका आणि कर्मचारी अशा तीन जणांच्या पथकावर तपासणीची जबाबदारी सोपविली आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांत अशी १५ पथके रुग्णालयांची तपासणी करीत आहेत.
सुधारणेसाठी महिन्याचा कालावधी
नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून एक महिन्याचा कालावधी सुधारणा करण्यासाठी देण्यात आला आहे. काही रुग्णालयांनी या नोटिशीला उत्तर देऊन सुधारणा केल्याचे आरोग्य विभागाला कळविले आहे. एक महिना पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून नोटीस पाठविलेल्या रुग्णालयांची तपासणी करून सुधारणा झाल्याची खात्री केली जाणार आहे. रुग्णालयांनी सुधारणा केली नसल्यास त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचे पाऊल आरोग्य विभाग उचलणार आहे.
महापालिकेककडून खासगी रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू असून, उपचारांचे दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, रुग्ण हक्क संहिता नसणे यांसह इतर नियमांचे पालन होत नसल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले. याप्रकरणी ७६ रुग्णालयांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका
खासगी रुग्णालयांची तपासणी
एकूण खासगी रुग्णालये – ८४९
तपासणी झालेली रुग्णालये – ७१४
नोटीस पाठवलेली रुग्णालये – ७६