पुणे : केंद्र आणि राज्य सरकारकडून सेंद्रीय शेती आणि जैविक कीडनाशकांच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना राबविल्या जात असल्या, तरीही रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी होताना दिसत नाही. राज्यात २०१९ पासून आजवर सरसरी १३ हजार टन कीडनाशकांचा वापर होत आहे. महाराष्ट्र रासायनिक कीडनाशकांच्या वापरात देशात आघाडीवर आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, देशात २०१७-१८ या वर्षात ६०,३१६ टन कीडनाशकांचा वापर झाला होता. सन २०२१-२२ मध्ये ५८,६५३ टन रासायनिक कीडनाशकांचा वापर झाला आहे. महाराष्ट्र कीडनाशकांच्या वापरात देशात आघाडीवर आहे. राज्यात २०१७-१८ मध्ये १५,५६८ टन कीडनाशकांचा वापर झाला होता. सन २०२१-२२ मध्ये १३,१७५ टन वापर झाला आहे. सन २०१९ पासून आजवर राज्यात सरासरी १३ हजार टन कीडनाशकांचा वापर होत आला आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशात सरासरी ११,६८८ टन, पंजाबमध्ये ५,३७६ टन, हरयानात ४०६६ टन, कर्नाटकमध्ये २,२२४ टन, आंध्र प्रदेशात १,७५९ टन, गुजरात १,८६९ टन कीडनाशकांचा वापर केला जातो.
हेही वाचा – धक्कादायक! डेंग्यू बळीचा पुणे पालिकेला दोन महिन्यांनंतर लागला ‘शोध’
राज्यात वापर का वाढला?
राज्यात सोयाबिन, कापूस, कांदा यांसारख्या नगदी पिकांचे, तसेच द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, स्ट्रॉबेरी, बोर, आंबा यांसारख्या फळशेतीचे आणि फुले, भाजीपाल्यांच्या शेतीचे क्षेत्र मोठे आहे. मका, कापूस आणि सोयाबिनचे क्षेत्र सुमारे ८० लाख हेक्टरवर गेले आहे. या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर कीडनाशकाचा वापर केला जातो. देशात कांदा, द्राक्षे, डाळिंब, स्ट्रॉबेरी, कापूस, सोयाबिनसह फळे आणि भाजीपाल्यांच्या उत्पादनात राज्य अग्रसेर आहे. त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचा वापर अपरिहार्य ठरतो आहे.
ईशान्य भारत, सिक्कीममध्ये वापर कमी
देशात सिक्कीम आणि मेघालयाने सेंद्रीय शेतीचे राज्य म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या राज्यांत रासायनिक कीडनाशकांचा वापर होत नाही. त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यांनीही संपूर्णपणे सेंद्रीय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन आणि परंपरागत कृषी विकास योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. जागतिक बाजारात सेंद्रीय शेती उत्पादनाचा निर्यातदार म्हणून भारत पुढे आला आहे. भारताने २०१८ – २०१९मध्ये ५,१५१ कोटी रुपयांच्या सेंद्रीय कृषी उत्पादनाची निर्यात केली आहे.
हेही वाचा – पिंपरी: पवना धरण ५१ टक्के भरले; पण पाणीपुरवठ्याच्या ‘या’ निर्णयात बदल नाही
राज्यातही कीडनाशकांचा वापर कमी होणार
राज्यात नगदी पिके, फळे, भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचा वापर अपरिहार्य ठरतो आहे. पण, राज्याच्या कृषी खात्याकडून सेंद्रीय शेती, जैविक कीडनाशकांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. नजीकच्या भविष्यात कीडनाशकांचा वापर कमी होईल, असे मत कृषी विभागाचे संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले आहे.