पुणे : ‘महाराष्ट्राला संगीताचे घराणे आणि नृत्यप्रकार नसला, तरी संगीताची सर्व घराणी आणि विविध अभिजात नृत्याविष्कार परंपरा महाराष्ट्रात रुजल्या. एवढेच नव्हे, तर विकसित झाल्या. गायन, वादन आणि नृत्य ही संगीताची त्रिविधा आत्मसात केलेले महाराष्ट्र सांगीतिकदृष्ट्या देशातील एकमेव प्रगल्भ राज्य आहे,’ असे मत लखनऊ येथील भातखंडे संगीत विद्यापीठाचे माजी कुलगुरू पं. विद्याधर व्यास यांनी मंगळवारी व्यक्त केले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पं. नंदकिशोर कपोतेलिखित ‘नाट्यशास्त्र व अभिनय दर्पणातील नृत्यतत्त्वे’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी व्यास बोलत होते. भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत आणि संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन या वेळी उपस्थित होते. व्यास म्हणाले, ‘देशातील संगीत घराण्यांचे उगमस्थान असलेल्या ठिकाणाहून ती घराणी दुसरीकडेच विकसित झाली असल्याचे दिसून येते. दौलतराव शिंदे यांच्यासारख्या शासकामुळे ग्वाल्हेर घराणे अजूनही आहे. उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्यामुळे मिरजला किराणा घराणे, तर उस्ताद अल्लादिया खाँ यांच्यामुळे कोल्हापूरला जयपूर घराणे विकसित झाले. या कलाकारांना महाराष्ट्राने भरभरून दिले. घराणेदार गायकी पुढे नेणारी शिष्यपरंपरा लाभली. आवर्तनातून येणारे आणि राग-तालाने सजलेले भारतीय संगीत एकमेवाद्वितीय आहे, हे हळूहळू सिद्ध होत आहे. लावणी हे तर कथकचे लोकरूप आहे.’

कपोते यांनी आपल्या मनोगतामध्ये पुस्तकाचे अंतरंग उलगडले.

दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये नृत्यकलेला आश्रय मिळाला नाही. मात्र, संगीताची उपासना झाली. यादवकालीन राजवटीत संगीत, काव्य या कलांना प्रोत्साहन मिळाले. शारंग देव यांच्या ‘संगीत रत्नाकर’ ग्रंथाची निर्मिती यादवकालीन आहे. तंजावर येथील भोसले घराण्याने संगीत कलाकारांना राजाश्रय दिला; पण, नंतरच्या काळात महाराष्ट्रात नृत्यकलेची उपासना वाढली. डाॅ. सदानंद मोरे, अध्यक्ष, राज्य साहित्य संस्कृती मंडळ