पुण्यात आज(शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. या स्पर्धेला कुस्ती चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
दरम्यान, अंतिम सामना सुरू होण्या अगोदर या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो, असं भाषणात विधान केलं, ज्याची सर्वत्र चर्चा होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणात म्हणाले, “लाल माती आणि मॅटवरचे पैलवान कुस्ती खेळतात. खरं म्हणजे आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो. पण अलीकडच्या काळात आमची कुस्ती ही फक्त टीव्हीवरच्या स्क्रीनवर चालते. पण टीव्हीच्या स्क्रीनवरच्या कुस्तीमधूनही कधीकधी राजकारणातला एक महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण नुकतंच बघितलं आहे. पण त्याही पेक्षा रंजक आणि आपल्या सर्वांना प्ररेणा देणारी अशाप्रकराची महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी आयोजित झाली. अत्यंत चुरशीच्या अशा दोन्ही उपांत्य फेऱ्या झाल्या. अंतिम सामना देखील चुरशीचा होईल.”
याशिवाय यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना एक आनंदाची बातमी दिली. आपल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारने कुस्तीपटूंचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ ब्रिजभुषण सिंह यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली, की आपल्या सर्वांचे आदरणीय, प्रेरणापुरुष कै. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून दिल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये मेडल मिळवणाऱ्या मल्लांना तयार करणाऱ्यांमध्ये मागे राहिला का? अशी शंका येते. म्हणून ब्रिजभूषण सिंह मी तुम्हाला आश्वास्त करू इच्छितो की, महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि आम्ही तुमच्या मदतीने अशाप्रकारचे खेळाडू तयार करू, की येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा कोणता ना कोणता मल्ल, कुस्तीपटू हा महाराष्ट्राचा असेल. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि आमचे क्रीडामंत्री गिरीश महाजन निश्चितपणे यासाठी पुढाकार घेतील.”