पुणे: महाराष्ट्र केसरी पहिलवान अभिजीत कटके यांच्या पुण्यातील घरी प्राप्ती कर विभागाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. ऐन विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत कटके यांच्या घरी छापा पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अभिजीत कटके हे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.
अभिजीत यांचे वडील चंद्रकांत कटके यांच्या वाघोलीतील घरात मंगळवारी सकाळी प्राप्ती कर विभागाचे अधिकारी पोहोचले होते. पथकाने कागदपत्रांची झाडाझडती घेत, कटके यांच्याकडे विचारपूसही केली. दरम्यान, कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करण्याच्या प्रयत्नातील असल्याची भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सासरे हे चंद्रकांत कटके आहेत. त्यांच्या घरी छपा टाकल्यामुळे ही राजकीय खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच, सोमवारी रात्री उशिरा खेड शिवापुर टोल नाक्यावर नाकाबंदीत ५ कोटी रूपये नेणार्या मोटारीला पोलिसांनी अडविले. त्यांच्याकडील रक्कम जप्त करीत कारवाई केली आहे. ही रक्कम शिंदे गटाच्या आमदाराची असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकार्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा : बिबवेवाडीतील ‘डॉल्फिन’ चौकातील रहिवाशांना होतोय ‘हा’ त्रास! पुणे महानगरपालिका मात्र करते दुर्लक्ष
भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे कोथरुड विधानसभा मतदारसंघातुन विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांना संबंधित मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, यापुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्यासोबत चर्चा केली होती. बालवडकरांचे सासरे चंद्रकांत कटके यांचे वाघोलीत घर आहे. त्याठिकाणी छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : आचारसंहिता जाहीर होताच महापालिकेत धावपळ, नक्की काय आहे कारण?
महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांनी एकदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला. तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी ठरले आहे. कटके पुण्यातील शिवरामदादा तालमीचा पहिलवान असून २०१५ मध्ये युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. त्यांनी २०१६ मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.