पुणे : राज्यात तलाठी भरती परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा तीन सत्रांत घेतली जाणार असून पहिल्या सत्रात नाशिक आणि नागपूर जिल्ह्यात पेपर फुटल्याची चर्चा होती. मात्र, या प्रकाराचे भूमी अभिलेख विभागाकडून खंडन करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने देखील या ऑनलाइन परीक्षेसाठी सायबर सुरक्षेबाबत काटेकोर नियोजन केले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा नियोजीत वेळेत ठरल्याप्रमाणे पार पडणार असून उमेदवारांनी निश्चिंतपणे परीक्षेला सामोरे जावे. अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहनही भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पुणे : मावळमध्ये उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यावर कारवाई; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या
राज्यातील तलाठी भरती परीक्षेमध्ये होणारे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे, पेपरफुटी प्रकरणामुळे भरती प्रक्रिया थेट जमाबंदी आयुक्तांच्या समन्वयाने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार ४४६६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. राज्यभरातून तब्बल साडेअकरा लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी दहा लाख ४० हजार ७१३ अर्ज छाननीअंती वैध ठरले. १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे.
याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अप्पर आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते म्हणाले, ‘गुरुवारपासून परीक्षेला सुरुवात झाली. नाशिक आणि नागपूर येथे पेपर फुटल्याचे कानावर आले. मात्र, संबंधित घटना परीक्षा केंद्रांवर न होता बाहेर झाल्याचे निदर्शनास आले आहे. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात जॅमर यंत्रणा बसविण्यात आली आहे. विद्युत उपकरणे, घड्याळ, मोबाइल, हेडफोन किंवा इतर वस्तू परीक्षा केंद्रावर नेण्यास उमेदवारांना मज्जाव करण्यात आला आहे. विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येत असल्याने प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वेगवेगळे आहे. उमेदवार परिक्षेला बसल्यानंतर १५ मिनिटांनी प्रश्नपत्रिका ऑनलाइन संगणकाच्या पडद्यावर येते. या प्रश्नपत्रिकेवर सांकेतिक चिन्ह, संगणक क्रमांक, काळ, वेळ तसेच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.’
हेही वाचा >>> पुणे : गुंडाच्या खून प्रकरणात १७ आरोपी अटकेत; पुण्यासह कर्नाटक, कोल्हापूर, सोलापूरमध्ये कारवाई
प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. अनुचित प्रकारांबाबत चौकशी करण्याबाबत किंवा माहिती देण्याचे समितीला आदेश दिले आहेत. त्यामुळे नाशिक आणि नागपूर येथील घटनांमध्ये पोलीसांकडूनही पेपरफुटल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. ऑनलाइन परीक्षा घेतल्याने इतर मार्गाने प्रयत्न करणाऱ्यांकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. नियोजित वेळेत आणि सुरक्षिततेत तलाठी भरती परीक्षा पार पाडली जाईल, असेही रायते यांनी स्पष्ट केले. – आनंद रायते, अप्पर आयुक्त, भूमी अभिलेख