लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून भारतीय ज्ञान प्रणालीवर (इंडियन नॉलेज सिस्टीम) आधारित सात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. उपविषय (मायनर) म्हणून विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित अभ्यासक्रमांबाबत महाराष्ट्रात होत असलेले काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या अभ्यासक्रमांचे प्रारुप देशपातळीवर नेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दिल्या जातील, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव के. संजय मूर्ती यांनी दिली.

आणखी वाचा-बार्टीने निर्णय फिरवला…१० जानेवारीला सीईटी होणार!

मूर्ती यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह डेक्कन कॉलेज विद्यापीठाला बुधवारी भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या चार विद्यापीठांच्या पुढाकारातून भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम राबवण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचेही मूर्ती यांनी सांगितले.

भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. या संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra model will be taken to national level seven new courses from next year pune print news ccp 14 mrj
Show comments