पुणे : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार असून, किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसासाठी महाराष्ट्रासह देशभरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे घाटमाथा ओलांडून पाऊस मध्य महाराष्ट्रापर्यंत दाखल झाला आहे. पुढील पाच दिवस किनारपट्टीवरील बहुतांश ठिकाणी, घाटमाथ्यावरील तुरळक ठिकाणी मुसळधार असणार आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
हेही वाचा : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनेचा आधार… काय आहे योजना?
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दोन आठवड्यांचा सुधारित अंदाज व्यक्त केला असून, २५ जुलैपर्यंत देशभरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संपूर्ण पश्चिम किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भ, ईशान्य भारत आणि मोसमी पावसाचे प्रमुख प्रभाव क्षेत्र असलेल्या मध्य भारतात चांगला पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाताय? भाविकांसाठी रेल्वेने केली विशेष सोय…
नांरगी इशारा – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर.
पिवळा इशारा – नाशिक, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
© The Indian Express (P) Ltd