लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रिय स्थिती तसेच उत्तर पूर्व अरबी समुद्रात चक्रिय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकण्यास पोषक आहे. त्यामुळे शनिवारी मोसमी वाऱ्यांनी कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, तर विदर्भातील नागपूरपर्यत धडक मारली. येत्या २४ तासांत पुणे, मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मोसमी वारे पोहचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. बुधवारपर्यंत (२८ जून) राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाने मोसमी वाऱ्यांच्या प्रवासास आवश्यक असलेले सर्व बाष्प खेचून घेतल्याने सुमारे दहा ते बारा दिवसांपासून कोकणातील रत्नागिरीच्या भागात मोसमी वारे थबकले होते. मात्र, शुक्रवारी बंगालच्या उपसागरात तयार आलेल्या चक्रिय स्थितीमुळे या वाऱ्यांनी झपाट्याने प्रगती करत विदर्भापर्यंत मजल मारली. शनिवारी त्यामध्ये आणखी वाढ होऊन कोल्हापूर, अलिबाग आणि नागपूरपर्यंत मोसमी वाऱ्यांनी वाटचाल केली.

हेही वाचा… पंकजा मुंडे या भाजपच्या जेष्ठ नेत्या, त्या कुठेही जाणार नाहीत- रावसाहेब दानवे

दरम्यान, पूर्व मध्य अरबी समुद्र ते म्यानमारपर्यंत ४० ते ४५ आणि त्यानंतर ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. मात्र त्याचा परिणाम मोसमी वाऱ्यांवर होण्याची शक्यता नाही. २८ जूनपर्यंत विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार, तर कोकणात अतिमुसळधार याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पोषक स्थितीमुळे मोसमी वाऱ्यांनी मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा काही भाग, तेलगंण, छत्तीसगड, मध्य प्रदेशाचा बहुतांश भाग, उत्तर प्रदेशाचा काही भाग, उत्तराखंडचा बराचसा भाग व्यापून पुढे हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाखपर्यंत शनिवारी धडक मारली. पुढील २४ तासात बिहार, छत्तीसगडचा उर्वरित भाग, दिल्ली, गुजरात राजस्थान, पंजाब या भागात पोहचणार आहे.

मोसमी वारे पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती

मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामध्ये उत्तरपूर्व बंगालचा उपसागर ते ओडिसा तसेच पश्चिम बंगालपर्यत चक्रीय स्थिती कार्यरत आहे. या चक्रीय स्थितीचे २४ तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे. याबरोबरच उत्तरपूर्व अरबी समुद्र ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती आहे. या दोन्ही स्थितीमुळे मोसमी वारे पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे.

बंगालच्या उपसागरात ओडिसा, पश्चिम बंगालपर्यंत चक्रिय स्थिती तसेच अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीपर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रिय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही स्थितीमुळे मान्सूनने शनिवारी अलिबाग, कोल्हापूर, नागपूरपर्यत धडक मारली. येत्या चोवीस तासात पुणे, मुंबईस उर्वरित महाराष्ट्र व्यापणार आहे. तसेच २८ जूनपर्यत राज्यात चांगला पाऊस बरसणार आहे. – अनुपम कश्यपी, हवामानशास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र पुणे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra monsoon update whole maharashtra covered by monsoon winds pune print news psg 17 dvr