महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच पुणेकरांनी ‘मनसे’ या पक्षाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, सातत्याचा अभाव, शहरातील प्रभावी नेतृत्वाची वानवा आणि महत्त्वाच्या निवडणुकांच्या वेळी पक्षाच्या ताकदीचा आणि जनमानसाचा कल जाणून घेण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका, तसेच पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी फारसे न झालेले प्रयत्न अशा विविध कारणांमुळे पुण्यात या पक्षाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत गेला. त्यामुळे कोणतीही निवडणूक आली की, मनसेला कोणीही फारसे मनावर घेत नसल्याची पुण्यात या पक्षाची प्रतिमा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. मात्र, उमेदवार कोण, असा प्रश्न या पक्षापुढे असणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी पक्षाने खात्रीशीर ‘शब्द’ द्यावा लागतो, तो पक्षातील कोणालाही दिल्याची परिस्थिती दिसत नाही. अन्य पक्षांत ‘भावी आमदारां’चे पेव फुटले असताना पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारीची खात्री नसल्याने ते तटस्थपणे बघ्याच्या भूमिकेत आहेत.
मनसेची २००६ मध्ये स्थापना झाल्यानंतर मुंबईनंतर पुणेकरांनी साथ दिली. स्थापनेनंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने रणजित शिरोळे हे नवोदित उमेदवार उभे केले. ते ७५ हजार मते घेत तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक पायगुडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी ९३ हजार मते घेऊन प्रभाव टाकला. मात्र, त्यानंतर झालेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मनसे तटस्थ राहिली आहे. या तटस्थतेच्या भूमिकेमुळे पक्षाचा प्रभाव क्षीण होत गेलेला दिसतो. निवडणूक लढविल्यास किमान पारंपरिक मतदार किती आहेत, याचा अंदाज तरी घेता आला असता. मात्र, तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करून मनसेने निवडणूक न लढविण्याच्या निर्णयामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाल्याचे दिसते. या निवडणुका लढविल्या असत्या, तर कोणत्या भागात मनसेचा पारंपरिक मतदार किंवा मनसेला मानणारा मतदार आहे, हे समजून त्या दृष्टीने पक्षाला आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये नियोजन करणे शक्य झाले असते. मात्र, हा अंदाज मनसेने घेण्याऐवजी तटस्थतेची भूमिका बजावलेली दिसते. त्याचा परिणाम हा विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला दिसून येतो.
हेही वाचा : पुणे: बाणेर टेकडीवर पुन्हा लूट, फिरायला आलेल्या तरुणासह मैत्रिणीला मारहाण
विधानसभा निवडणुकांमध्येही मनसेने सर्व मतदारसंघांत निवडणूक लढविण्याऐवजी काही ठिकाणी तत्कालीन परिस्थितीनुसार उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्याच्या सातत्याच्या अभावाचा या पक्षाला कायम फटका बसत आला आहे. स्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार रमेश वांजळे निवडून आले होते. त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर या मतदारसंघाकडे मनसेने फारसे लक्ष दिले नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मनसेने उमेदवारच दिला नाही.
मनसेचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांपैकी कोथरूड हा मतदारसंघ आहे. या विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना सलग तीन वेळा संधी देण्यात आली. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी चांगली टक्कर दिली होती. ते दुसऱ्या स्थानावर राहिले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत चौथ्या स्थानावर गेले. गेल्या निवडणुकीत त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध लढत देऊन दुसऱ्या स्थानावर राहिले.
हेही वाचा : कृष्णविवराभोवतीच्या तारकीय; अवशेषांतून नाट्यमय उद्रेक; आयुकाचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन गटाचा शोध
हडसपर विधानसभा मतदारसंघातही मनसेची ताकद होती. माजी नगरसेवक वसंत मोरे २००९ मध्ये तिसऱ्या स्थानावर, तर २०१४ मध्ये नाना भानगिरे चौथ्या स्थानावर राहिले होते. त्यानंतर गेल्या निवडणुकीत मोरे यांनी पुन्हा निवडणूक लढविली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर मनसेमध्ये असताना त्यांनी लढत दिलेली दिसते. २००९ च्या निवडणुकीत ते दुसऱ्या, तर २०१४ च्या निवडणुकीत ते तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर त्यांनी मनसे सोडल्यानंतर या पक्षाचा कसब्यातील प्रभाव दिसेनासा झाला आहे. शिवाजीनगरमध्ये २००९ च्या निवडणुकीत रणजित शिरोळे यांनी ताकद दाखविलेली दिसते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना छाप टाकता आलेली नाही. पर्वती मतदारसंघाकडे या पक्षाने विशेष लक्ष दिलेले दिसत नाही. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून उमेदवारच उभा केला नाही. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकांमध्ये या पक्षाचा उमेदवार नाही.
हेही वाचा : तळेगाव टोलनाक्यावर तस्करी करुन आणलेले साडेचार कोटींचे सोने जप्त, महसूल गुप्तचर संचलनालयाची कारवाई
महापालिका निवडणुकांमध्येही या पक्षाचा प्रभाव हळूहळू कमी झालेला दिसतो. २००७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये आठ नगरसेवक होते. २०१२ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच २९ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर या पक्षाची शहरात वाताहत झाली. २०१७ मध्ये अवघे दोन नगरसेवक निवडून आले. याला धरसोडवृत्ती आणि पक्षांतर्गत गजबाजी कारणीभूत ठरली आहे. पक्षाचे अनेक जुने पदाधिकारी सोडून गेले आहेत. त्यामध्ये रवींद्र धंगेकर, वसंत मोरे हे आहेत. काही जुने पदाधिकारी सक्रिय नाहीत, तर सक्रिय असणारे पदाधिकारी स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, अशा कोंडीत मनसे सापडलेली आहे. आता या वेळच्या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पुण्याकडे लक्ष देणार आहेत. त्यामुळे तटस्थ मनसेला पुणेकर कशी साथ देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
sujit.tambade@expressindia. com