पुणे : बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांतून आवश्यक सेवा मराठी भाषेतून उपलब्ध करून मुद्रित अर्जांचे नमुने मराठी भाषेमध्ये उपलब्ध द्यावे; तसेच खातेदारांशी संवाद साधताना बँकेतील कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बँकेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक के. राजेशकुमार यांची भेट घेतली. त्यामध्ये या मागण्यांंचे निवेदन दिले.
मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापूर्वी अनेकदा आक्रमक झाली होती. याआधी देखील मराठी भाषेत दुकानांवर पाट्या लावण्यात याव्यात यासाठी मनसेने आंदोलने करत प्रसंगी खळखट्याक चा मार्ग अवलंबला होता. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रमाणात शांत झालेली मनसे आता पुन्हा आक्रमक होत मराठीच्या प्रश्नावर भूमिका मांडत असल्याचे यानिमित्ताने पहायला मिळत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना मराठी भाषेतून अर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे परिपत्रक काढले आहे. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्राच्या अनेक शाखांमध्ये अद्यापही मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. खातेदारांच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे मुद्रित नमुने मराठी भाषेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप संभूस यांनी केला. बँकेच्या बहुतांश शाखांचे शाखा व्यवस्थापक हे अमराठी व्यक्ती असल्याचे आढळून आले आहे. अनेक मराठी कर्मचाऱ्यांंची क्षमता असून देखील त्यांना शाखा व्यवस्थापक या पदापासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे बँकांच्या शाखा व्यवस्थापकपदी मराठी कर्मचाऱ्यांंची नियुक्ती करण्याची मागणी असल्याचे संभूस यांनी सांगितले.