पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेचा (नीट) निकाल राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. त्यात देशातील पहिल्या ५० विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीमध्ये मुंबईच्या ऋषी बालसे याने ७१० गुणांसह देशात सहावा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला. परीक्षेत जवळपास ५६ टक्के विद्यार्थी पात्र ठरले असून, राज्यातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. प्रवेशासाठी आवश्यक पात्रता गुणांमध्ये (कटऑफ) गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकाल जाहीर केला. निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाविषयी उत्सुकता होती. मात्र तो सायंकाळी जाहीर न होता रात्री उशिरा जाहीर झाला. यंदा नीटसाठी नोंदणी केलेल्या १८ लाख ७२ हजार ३४३ विद्यार्थ्यांपैकी १७ लाख ६४ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ९ लाख ९३ हजार ६९ विद्यार्थी पात्र ठरले. परदेशातील १४ शहरांसह एकूण ४९७ शहरांतील ३ हजार ५७० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. निकालामध्ये ४ लाख २९ हजार १६० मुले, ५ लाख ६३ हजार ९०२ मुली, तर सात तृतीयपंथी पात्र ठरल्याचे एनटीएने नमूद केले. राज्यातून २ लाख ५६ हजार १२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २ लाख ४४ हजार ९०३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १३ हजार ८१२ विद्यार्थी पात्र ठरले. गेल्यावर्षी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती, तर ७९ हजार ९७४ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यामुळे यंदा परीक्षा दिलेल्या आणि पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये ऋषी बालसे याने  देशात सहावा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर साहील बजाज आणि वैदेही झा यांनी ७०५ गुण मिळवत अनुक्रमे वीस आणि एकविसावा क्रमांक प्राप्त केला. विकलांग गटातून देशातील पहिल्या दहा मुलींच्या यादीत राज्यातील नभन्या झरगडने, तर मुलांच्या यादीत अर्णव पाटीलने स्थान पटकावले. आर्थिकदृष्टय़ा मागास गटातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील वरद जाधव (अखिल भारतीय स्थान ४८), राजनंदिनी मानधने (अखिल भारतीय स्थान ९४) यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती गटात सौरव मेळेकर, ब्रह्मा कोमवाड यांचा समावेश आहे.

मराठीतून परीक्षा देणाऱ्यांमध्ये घट..

नीट परीक्षेसाठी इंग्रजी आणि हिंदूीसह १३ भाषांचे पर्याय उपलब्ध असतात. यंदा सर्वाधिक १४ लाख ७५ हजार २४ विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून परीक्षा दिली, तर २ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली. २०१९मध्ये ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली होती. तर, २०२०मध्ये १ हजार ५ आणि  २०२१मध्ये केवळ ९६३ विद्यार्थ्यांनी मराठीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे मराठीतून परीक्षा देणाऱ्यांचा टक्का लक्षणीय घटल्याचे दिसून येते. यंदा एकूण १ लाख ३७ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रादेशिक भाषांतून परीक्षा दिली. २०१९मध्ये १ लाख ३४ हजार ५५०, २०२०मध्ये १ लाख २९ हजार ७६३, २०२१मध्ये १ लाख २० हजार ६१६ विद्यार्थ्यांनी प्रादेशिक भाषेला पसंती दिली होती.

नीटच्या तयारीसाठी खासगी शिकवणी लावली होती. गुणवत्ता यादीत स्थान मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मात्र देशात सहावा आल्याचा आनंद आहे. संगीतामध्ये रुची असल्याने पियानो वाजवायला शिकलो आहे आणि गिटार शिकतो आहे. अभ्यास करताना माझ्या छंदालाही वेळ देत होतो.

ऋषी बालसे, देशात सहावा

TOPICSनीट
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra neet result 2022 rishi vinay from mumbai secures all india rank 6 zws