पुणे : शिक्षकांची छायाचित्रे शाळेतील वर्गाच्या भितींवर लावण्याऐवजी आता छायाचित्रे शिक्षक परिचय फलकावर समाविष्ट केली जातील. शिक्षकांची छायाचित्रे लावण्याचा निर्देश केंद्राने दिलेला असल्याने तो डावलता येणार नाही. मात्र छायाचित्रे लावण्यास राज्यातून विरोध होत असल्याने मध्यममार्ग काढण्यात आला आहे. त्याला प्राथमिक शिक्षक संघाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली.
हेही वाचा >>> ईडा पिडा टळून राज्यातल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना
केसरकर म्हणाले,की शिक्षकांची छायाचित्रे लावल्याने विद्यार्थ्यांनाही आपले शिक्षक कोण आहेत हे कळेल. तुलनेने महाराष्ट्रात गैरप्रकार कमी होतात. त्यामुळे राज्यातून शिक्षकांची छायाचित्रे लावण्यास विरोध झाला. त्यामुळे शिक्षकांची छायाचित्रे शिक्षक परिचय फलकावर लावण्याचा मध्यममार्ग काढण्यात आला. त्याला बऱ्याच शिक्षक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
काय झाले? : बोगस शिक्षकांना चाप लावण्यासाठी ‘आपले गुरुजी’ उपक्रमाअंतर्गत शिक्षकांची छायाचित्रे शाळेतील वर्गाच्या भितींवर लावण्याच्या निर्णयाला राज्यभरातून शिक्षक, शिक्षक संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुण्यात आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.