पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट २) परीक्षेतील इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. या प्रकरणी एससीईआरटीच्या वतीने युट्यूबवरील २१ वाहिन्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्टार्स उपक्रमाअंतर्गत इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पॅट परीक्षा एससीईआरटीतर्फे घेण्यात येते. एससीईआरटीने या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करून राज्यभरातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांना वितरित केल्या. मात्र सोमवारी इयत्ता नववीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांत पसरल्याचा प्रकार निदर्शनास आला. युट्यूबवरील वाहिन्यांवर प्रश्नपत्रिका दाखवून ती सोडवण्याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या चित्रफिती प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामुळे परीक्षेच्या गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या पार्श्वभूमीवर, एससीईआरटीच्या वतीने सहायक संचालक संगीता शिंदे यांनी फरासखाना पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. स्कॉलरशिप स्टडी, ट्यूटर एडीएम, नॉलेज गंगा, अनिकेत, ए ए क्लासेस, प्रशांत वारे आर्टिस्ट, झेन झेड लर्निंग बाय एम _आर, एच टी स्टडी 2.0, लर्न विथ अनु २१, @ सेमी मराठी क्लास, भाषणमित्रा, आर डी क्लब, एस बी सूरज क्रिएशन, एम एच एज्युकेशन, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र, शिवस्तुती रायटिंग, स्कॉलरशिप स्टडी, मी गुरुजी, एम एच स्टडी, स्टडी टाईम, स्टडी पार्टनर या वाहिन्यांनी राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रसारित करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे संबंधित वाहिन्या, तसेच त्यांना प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात कायदेशीर फिर्याद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संबंधित वाहिन्या कोणाच्या?

प्रश्नपत्रिका युट्युबवरील वाहिन्यांद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, या वाहिन्या शिक्षक, खासगी शिकवणीचालक यांच्यापैकी कोणाच्या आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पूर्वीही पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र एससीईआरटीने पहिल्यांदाच कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे.